नाशिक : अवकाळी पावसामुळे नुकसान  झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक दौऱ्याला सुरुवात केली. पावसाने नुकसान झालेल्या नाशिकच्या बागलाण आणि निफाड तालुक्यातील नुकसानीची पाहणी खोत यांनी केली. नैसर्गिक आपत्तीत शेतकरी सापडलेला असताना जिल्हा बँकांनी मोठ्या थकबाकीदार शेतक-यांना नोटीसा पाठविल्य़ा असल्या तरी त्याचा अहवाल मागविण्यात आला असून, बँकांनी जर शेतक-यांना त्रास दिला तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या वेळी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात परतीच्या पावसाने अनेक शेतक-यांचे द्राक्ष बाग संपुष्टात आल्या त्यांच्या पाहणीसाठी सदाभाऊ खोत यांनी बिजोटे, पिंपळवाड, करंजाड, द्याने या गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांवर जप्तीची, त्यांच्या जमिनीचे लिलाव करणाऱ्या बँकेवरही कारवाईचा इशारा खोत यांनी दिला आहे.

शेतक-यांनी द्राक्षांना पिक विमा मिळत नसल्याचं सांगितले. सरकारने सरसकट सर्वच पिकांचे पंचनामे करण्याचे आदेशही खोत यांनी या प्रसंगी दिले. जिल्हा बँक थकबाकीदारांना नोटीसा पाठवून वसुली करत असल्याच समजताच त्यांनी शेतक-यांच्या कुठल्याही प्रकारच्या वस्तूंचा लिलाव होऊ देणार नाही असे सांगत बँकांनी शेतक-यांना त्रास दिला तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा देत शेतक-यांपेक्षा कोणी मोठा नसल्याचं खोत यांनी स्पष्ट केलं.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान पाहणी करताना गोपाल जाधव मौजे बिजोटे ता. सटाणा जि. नाशिक या शेतकऱ्याच्या शेतात गाडीला जायला वाट नव्हती तर कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी प्रोटोकाॅलचा विचार न करता एका शेतकऱ्याची मोटार सायकल घेऊन त्याच्या शेतात गेले व पाहणी केली आणि त्वरीत त्याचा पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.