बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधव कर्नाटक राज्याच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात. कोल्हापूर आणि  बेळगाव जिल्ह्यातील सीमाभागात आज मराठी बांधव बंद पाळून कर्नाटक सरकारच्या जुलमी राजवटीचा निषेध नोंदवतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून सुरु झालेला हा काळा दिवस गेली 63 वर्षे पाळला जात आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणांनी बेळगाव परिसर आज दणाणून गेला.

बेळगावमध्ये मोर्चा आणि निषेध रॅली काढून काळा दिवस पाळला जात आहे. बेळगावमधील संभाजी महाराज उद्यानातून मूक मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये महिलांबरोबरच लहान मुलं आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यावेळी मराठी बांधवांनी केंद्र सरकारबरोबरच महाराष्ट्र सरकारवरही नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने नाक दाबलं की केंद्र सरकार तोंड उघडते. त्यामुळे 370 प्रमाणे हा प्रश्न देखील सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

सीमावासियांचा मुंबईत निषेध
सीमा भागातून मुंबईत स्थाईक झालेले नागरिकही आजच्या दिवशी आपल्या राहत्या ठिकाणी 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात. मुंबईतील डिलाई रोड परिसरात आज सकाळपासून नागरिकांनी हाताला काळी रिबीन बांधून आणि काळे झेंडे घेऊन कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली.

अनेक लढे झाले, अनेकांनी प्राण गमावले, परंतु प्रश्न अजूनही प्रलंबित
1 नोव्हेंबर 1956 रोजी स्वतंत्र भारतात भाषावर प्रांतरचना झाली, त्याच दिवशी बेळगावसह 40 लाख मराठी  माणसं कर्नाटक राज्यात विभागली गेली. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूरसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक लढे झाले, अनेकांनी प्राण गमावले. परंतु हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यात येतो. या निमित्ताने हजारो सीमावासिय एकत्र येऊन निषेध व्यक्त करतात.