राजू शेट्टींनीही लंकेतील अशोकवनाची फळं तीन वर्ष चाखली : सदाभाऊ खोत
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2017 10:37 PM (IST)
राजू शेट्टींना त्यावेळी आपण अशोकवनात असल्याचं का कळलं नाही, असा सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.
सांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. हनुमानाच्या दिलेल्या उपमेचा सदाभाऊंनी खरपूस समाचार घेत तीन वर्षे राजू शेट्टींनी याच लंकेतील अशोकवनाची फळं चाखली आहेत, असं म्हणत पलटवार केला. राजू शेट्टींना त्यावेळी आपण अशोकवनात असल्याचं का कळलं नाही, असा सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. राजू शेट्टी नेहमी चर्चेत राहण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना माझ्यावर आणि सरकारवर आरोप करण्याशिवाय दुसरं काम उरलं नाही, असा टोलाही सदाभाऊंनी लगावला. राजू शेट्टींना बिल्ला लावायला मी शिकवलं आहे. त्यामुळे त्यांनी मला बिल्ला लावायला शिकवू नये. त्यांच्या अगोदरपासून मी बिल्ला लावून फिरत होतो, ते नंतर आले, अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींच्या टीकेचा समाचार घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर खासदार राजू शेट्टी यांनी नाव घेता निशाणा साधला. “आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला होता, मात्र तोही शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला.”, अशी टीका राजू शेट्टींना सदाभाऊंवर केली.