पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातली दरी वाढताना दिसते आहे. आता तर सदाभाऊ खोत हे स्वाभिमानीच्या सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडले आहेत.
खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘भाजपने स्वाभिमानी संघटनेचा शिखंडी केला आहे’ अशी प्रतिक्रिया दिली. राजू शेट्टींचं हे वक्तव्य सदाभाऊ खोत यांना कळल्यानंतर, ते स्वाभिमानी संघटनेच्या सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपमधून 'लेफ्ट' झाले.
पुण्यात आज खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद किती टोकाला गेला आहे, हे पाहायला मिळालं. सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी असलेल्या शासकीय विश्रामगृहातून मुक्काम हलवला. सदाभाऊ खोत यांनी काल (गुरुवार) उशिरा अचानक नोंदणी रद्द केली.
पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी शासकीय विश्रामगृहात खोल्या बुक केल्या होत्या. मात्र राजू शेट्टी त्याच विश्रामगृहात उतरणार असल्याचं समजताच सदाभाऊंनी ऐनवेळी पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहात उतरण्याचा निर्णय घेतला.
यानंतर सदाभाऊंचं रजिस्टरमधलं नाव खोडण्यात आलं. राजू शेट्टी यांना टाळण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी विश्रामगृह बदलून घेतलं. विशेष म्हणजे राजू शेट्टी थांबलेल्या विश्रामगृहात विजय शिवतारे, दीपक केसरकर, दिलीप कांबळे हे मंत्रीही उतरले आहेत.
एकंदरीत एकेकाळचे जिगरी दोस्त आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असलेले खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी वाढताना दिसते आहे. शेट्टी आणि खोत यांच्यातील वाढत्या विसंवादाचा शेवट नक्की काय असेल, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.