मुंबई : राज्यातील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे त्याची बाजारात आवक वाढली आहे. याचाच विचार करुन राज्य शासनानं तुरीसह सर्व डाळींच्या घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठीच्या साठवणूक मर्यादेत तीन पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे डाळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
या निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रात साठा मर्यादा घाऊकसाठी 3,500 क्विं. वरुन 10,500 तर किरकोळसाठी 200 वरून 600 क्विंटल तसेच अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात घाऊकसाठी 2,500 क्विं. वरून 7,500 तर किरकोळसाठी 150 वरुन 450 क्विं. आणि इतर ठिकाणी घाऊकसाठी 1,500 वरुन 4,500 क्विं तर किरकोळसाठी 150 वरून 450 क्विंटल इतकी वाढ करण्यात आली आहे. डाळींचा खरेदी हंगाम म्हणजे 31 मार्च 2017 पर्यंत ही साठा मर्यादेची सुधारणा लागू राहणार आहे.
गेल्या वर्षीच्या हंगामात तुरी उत्पादन कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवला होता. त्यावेळी राज्य शासनाने तूर उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणावर तूर डाळींचे उत्पादन झाले आहे. ही तूर सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. तसेच नाफेडमार्फतही 5,500 रुपये प्रति क्विंटल हमी भावावर तूर खरेदी करण्यात येत आहे. मात्र, त्याला मर्यादा आहेत. तसेच बाजारात मोठ्या प्रमाणात तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.
मात्र, डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा असल्यामुळे व्यापारांकडून खरेदी कमी प्रमाणात होत होती. या गोष्टींचा विचार करून राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने डाळींच्या साठवणूक मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे बाजारात तुरीचे दर स्थिर होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या तुर डाळींची खरेदी वाढण्यास मदत होणार आहे, श्री. बापट यांनी यावेळी सांगितले.
साठा मर्यादेत सुधारणा झाल्यासंबंधीची माहिती विभागाने सर्व जिल्हाधिकारी, पुरवठा विभागातील संबंधितांना कळवून यासंबंधीची तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याचेही श्री. बापट यांनी सांगितले आहे.