कोल्हापूर : आई शपथ घेऊन सांगतो 'कडकनाथ' कोंबड्यांच्या घोटाळ्याप्रकरणी माझा संबंध नाही, असं वक्तव्य कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, असं आव्हान देखील सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलं.


कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास 500 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कडकनाथ संबंधीची कंपनी सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप होत आहे. यावरुन सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.



मी मंत्री झाल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातत्याने माझ्यावर चुकीचे आरोप होत आहे. कडकनाथ संबंधीच्या रयत अॅग्रो कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. महा रयत अॅग्रो आणि रयत क्रांती संघटना दोन शब्द समान असल्याने विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर झालेले आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. मात्र आरोप सिद्ध झाले नाही, तर आरोप करणाऱ्यांनी भरचौकात विष्टा खावी, असं आव्हान त्यांनी दिलं.


कडकनाथ प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोंबडी चोर म्हणणाऱ्यांना कोंबडीची तंगडी आवडते अशीही टीका खोत राजू शेट्टी यांच्यावर केली.