रायगड : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र आज सकाळी 7 वाजेच्या दरम्यान मुंबईहून सावर्डे जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतला. मुंबई-गोवा हायवेवर असलेल्या माणगाव-महाड दरम्यान लोणेर गावाजवळ ही घटना घडली. या बसमध्ये 60 प्रवासी होते, सुदैवाने कुणालाही दुखापती झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, बस धावत असताना बोनेटमधून धूर निघत असल्याचं बस चालकाच्या निदर्शनात आलं. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवत तात्काळ बस थांबवून बसला आग लागण्यापूर्वी सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणारे हे सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
काल रात्रीपासून मुंबईहुन कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईहुन कोकणाकडे प्रवास करत आहेत. त्यामुळे काल रात्रीपासूनच 2 ते 3 किमीच्या वाहनांच्या रांगा पेण-माणगावदरम्यान अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
त्यात आज सकाळी लोनेरजवळ वडपाले येथे अचानक बसने पेट घेतल्यामुळे काही वेळ कोकणाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, अग्निशमनदलाकडून ही आग विझवण्यात आली असून या मार्गावर पुन्हा वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. मात्र मुंबई-गोवा हायवेवर अनेक ठिकाणी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.