मुंबई : महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरु होतोय, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे यांच्या पत्रासंदर्भात बोलताना दिली आहे. दरम्यान, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटक प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहे. याप्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी पत्र लिहून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. परमबीर सिंह यांच्या लेट बॉम्बनंतर सचिन वाझे यांच्या लेटबॉम्बमुळे विरोधकांनी महाविकास सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. जे लोक जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. असं असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतलं जाऊ शकतं. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "अनिल परब यांचं नाव आलं आहे. अजित पवार, अनिल देशमुख यांचं नाव आलं आहे. ही नावं कोण घेतंय? गुन्हा केल्यामुळे अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतलं जातं आणि तो पुरावा म्हणून समोर आणलं जातं. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही. काल त्यांनी शपथ घेऊन आरोप खोटे असल्याचं सांगितलं असून माझा त्यांच्यावर विश्वास आहे."
पाहा व्हिडीओ : अनिल परब किंवा कोणताही शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही : संजय राऊत
"राष्ट्रीय तपास यंत्रणा आपण ज्यांना म्हणतो आपण, त्यांच्यासाठी राज्यातील विरोधी पक्ष लाल गालीचे अंथरतात, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी अशा प्रकारे कोंडीत पकडून अस्थिर करण्याचे डावपेच करत असतील तर यशस्वी होणार नाही, हे समजून घ्या. काल एका पत्रलेखकाचं पत्र आलं, एनआयएच्या हाती पत्र आहे. हे पत्रलेखक एनआयच्या ताब्यात आहेत. अशाप्रकारचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या संपूर्ण इतिहासात झालेले नाही. एखाद्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी इतक्या यंत्रणा वापरल्या जात आहेत. त्या पत्राची सत्यता कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्मे आहेत, याविषयी विरोधी पक्षाने एकदा स्पष्ट करावं.", असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
Sachin Vaze Case: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो हे खोटं आहे : अनिल परब
"अनिल परब यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊन काही करणार नाही.", असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे सचिन वाझे यांच्या कथित पत्रात?
जून 2020 रोजी मला सेवेत घेण्यात आले. पण काही लोकांकडून याचा विरोध झाला. अनिल देशमुख यांनी मला बोलावून सांगितले की, शरद पवार तुम्हाला पुन्हा सेवेत घेऊ इच्छित नाहीत. देशमुख यांनी मला पवार साहेबांना पटवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी त्यांनी मला दोन कोटी रुपये मागितले. मग मी देशमुख यांना सांगितले की मी इतके पैसे देऊ शकत नाही. यावर अनिल देशमुख म्हणाले की तुम्ही नंतरही पैसे देऊ शकता. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये माझी सीआययूमध्ये नियुक्ती करण्यात आल्यानंतर गृहमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात मला बोलावले. मला गृहमंत्र्यांनी आठवण करुन दिली की तुम्हाला दोन कोटी रुपये द्यावे लागतील. त्यावेळीही मी असमर्थता दर्शविली. यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये दर्शन घोडावट नावाचा व्यक्ती जो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचा आहे यांनी माझी भेट घेतली. घोडावट यांनी मला फोन नंबरसह महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे गुटखा व तंबाखूचा पुरवठा सुरू असल्याची माहिती दिली. घोडावट यांनी मला सांगितले की हा गुटखा व्यापार कोटींमध्ये आहे. त्यातून मला महिन्याकाठी 100 कोटी जमा करण्यास सांगितले. त्यावेळी मी असे काहीही करण्यास नकार दिला होता. माझ्या नकारानंतर घोडावट यांनी मला पुन्हा नोकरी जाण्याची धमकी दिली, असा गौप्यस्फोट सचिन वाझे यांनी पत्रात केला आहे.
अनिल परब यांनी बनावट ठेकेदारांकडून 2 कोटींची वसुली करण्यास सांगितले
शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी जुलै आणि ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्या शासकीय बंगल्यावर मला बोलावले होते. तेव्हा त्याच आठवड्यात मुंबईतील डीसीपी बदल्या तीन ते चार दिवसात मागे घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत अनिल परब यांनी मला सांगितले की एसबीयूटीच्या तक्रारींचा आपण शोध घ्यावा आणि तुम्ही एसबीयूटीच्या विश्वस्तांचा सल्ला घ्यावा.तपासाची चर्चा करा असंही सांगितलं. मंत्री अनिल परब यांनी ही चौकशी बंद करण्यासाठी 50 कोटींची मागणी एसबीयूटीकडे करण्यास सांगितले. त्यावेळी मी म्हणालो होतो की मी हे सर्व करू शकत नाही कारण मला एसबीयूटी बद्दल काही माहित नाही आणि या तपासणीवर माझा काहीच ताबा नाही. जानेवारी 2021 मध्ये मंत्री अनिल परब यांनी मला पुन्हा बोलवले आणि सांगितले की तुम्ही बीएमसीमध्ये घोटाळेबाज कंत्राटदाराची चौकशी करावी आणि अशा सुमारे 50 बनावट ठेकेदारांकडून एकूण 2 कोटींची वसुली करण्यास सांगण्यात आले. ही तपासणी अद्याप अगदी प्राथमिक पातळीवर आहे आणि माझी बदली होईपर्यंत त्या तपासणीत मला काहीही आढळले नाही, असं सचिन वाझे यांनी पत्रात लिहिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- परमबीर सिंहानंतर सचिन वाझेंचा 'लेटर बॉम्ब'; अनिल परब, अनिल देशमुखांवर गंभीर आरोप
- माजी गृहमंत्र्यांनी वसुलीबाबत चौकशी केली; पोलीस अधिकारी राजू भुजबळ आणि संजय पाटील यांचे कबुली जबाब 'एबीपी माझाकडे'