मुंबई : सचिन वाझे यांचं पत्र हे अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन सत्य काय ते बाहेर आलं पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचसोबत सरकारनं लसींसंदर्भातील राजकारण थांबवलं पाहिजे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. सचिन वाझे यांचं पत्र आणि राज्यांत सध्या निर्माण झालेला लसींचा तुटवडा या प्रकरणांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की, "सचिन वाझे यांचं पत्र अत्यंत गंभीर, तसेच त्यामधील मजकूरही आपल्या सर्वांना विचार करायला लावणार आहे. एकूणच महाराष्ट्रात जे घडतंय किंवा ज्या गोष्टी बाहेर येत आहेत, त्या महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी चांगल्या नाहीत. तसेच पोलिसांच्या प्रतिमेसाठीही चांगल्या नाहीत. मी आज यावर एवढंच म्हणेल जे पत्र समोर आलं आहे, त्यासंदर्भात आधीच माननिय उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करण्यास सांगितलं आहे. तसेच याप्रकरणी जे काही समोर येत आहे, त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी किंवा जी यंत्रणा करत असेल त्यांनी करावी. अशा प्रकारचं पत्र समोर आल्यानंतर त्याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "या प्रकरणी जे काही जबाब नोंदवण्यात येत आहेत. याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे. मुळात या सर्व प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते सत्य बाहेर येणं. सत्य जर लवकर बाहेर आलं नाही, तर ही जी प्रतिमा डागाळतेय ती कधीच ठिक होऊ शकणार नाही."
रेडमीसिवीरचा काळा बाजार रोखला पाहिजे : देवेंद्र फडणवीस
"सरकरानं रेडमीसिवीरच्या संदर्भात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण मागच्याही वेळी आपण पाहिलं की, रेडमीसिवीरच्या काळा बाजार काही लोकं करत होते. आताही हिच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. मुळातच आताची कोरोनाची दुसरी लाट आहे, ती देशातील सर्व राज्यांमध्ये नाहीये, तर ती काहीच राज्यांमध्ये आहे. मागची लाट ही सगळ्या राज्यांमध्ये होती. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये लाट नाही, त्या ठिकाणाहून आपल्याला रेडमीसिवीर घेता येईल का? याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुरवठा राज्याला करण्यात आलाय : देवेंद्र फडणवीस
"केंद्रीय आरोग्यमंत्र्याचं पत्र काल आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. महाराष्ट्र सरकारने लसीचं राजकारण बंद केलं पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद केलं पाहिजे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला झालेल्या लसींच्या पुरवठ्यासंबंधीची आकडेवारी दिली आहे. टीका करणाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे की, महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुरवठा राज्याला करण्यात आला आहे." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :