Pune Bypoll election : एकीकडे विरोधी पक्ष नेते अजित पवार  (Ajit Pawar) महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे (Rahul kalate) यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी  प्रयत्न करत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेचे सचिन अहिर हेदेखील उद्या राहुल कलाटेंची भेट घेणार आहे. मात्र जर निवडणूक झाली तर मी ( pune bypoll election ) निवडणूक लढवणार अशी ठाम भूमिका राहुल कलाटेंनी घेतली आहे. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना उमेदवारी दिली त्यामुळे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी सध्या महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु आहे.


राहुल कलाटे यांनी बंडखोरी करु नये आपला अर्ज मागे घ्यावा, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्यानुसार आमदार सुनील शेळके आणि अजित पवारांनीदेखील राहुल कलाटेंची भेट घेतली आहे. मात्र आता उद्या शिवसेनेचे सचिन अहिर यांची भेट घेतल्यावर अर्ज मागे घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


राहुल कलाटे म्हणाले की, ज्यावेळी या चिंचवडमध्ये कोणीही अपक्ष लढण्याची तयारी ठेवत नव्हतं त्यावेळी मी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात विधानसभा लढलो होतो. त्यावेळी लोकांनी मला भरभरुन प्रेम दिलं आहे. त्यांनी लाखांच्यावर मतं दिले आहेत आणि या शहराच्या जनतेची जी लोक भावना आहे त्याचा आदर मला करावाच लागेल, असं ते म्हणाले.


...तरच मी अर्ज मागे घेईन!
भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यावर ते म्हणाले की, राष्ट्रवादीने ही निवडणूक बिनविरोध द्यावी, तर मी अर्ज मागे घेण्याचा विचार करीन. बिनविरोध उमेदवार देऊ असं जेव्हा राष्ट्रवादीचे नेते म्हणत होते. त्यावेळी मी अर्ज भरणार नाही हे स्पष्ट केलं होतं. मात्र ज्यावेळी राष्ट्रवादीचे नेते निवडणुकीसाठी पुढे आले. महाविकास आघाडीने लढणार असं जाहीर केलं त्यावेळी मी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र या निवडणुकीसाठी 33 अर्ज वैध आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या निवडणुकीसाठी उमेदवार झालेत. त्यामुळे ही निवडणूक होणार हे निश्चित असल्याचं ते म्हणाले.


आवडीचा उमेदवार निवडून देण्याचा नागरिकांना लोकशाहीचा अधिकार आहे. त्यामुळे माझ्याबाबतीत जनता निर्णय घेईल. मी दोन वेळा या शहरातून विधानसभा निवडणूक लढलो आहे. त्यावेळी मला लोकांनी भरभरुन मतदान केलं होतं. त्यामुळे यावेळी मी जनतेचा अनादर नाही करु शकत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता उद्या सचिन अहिरांच्या भेटीनंतर राहुल कलाटे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.