पुणे : पुण्यात 'आपलं घर' योजनेत हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या 'मेपल'चा सचिन अग्रवाल पोलिसांसमोरच पसार झाला. सचिन अग्रवालवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनीच त्याला पलायन करण्यात मदत केली.

 

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि सचिन अग्रवाल एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात लाईव्ह होते. याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिस तातडीने सचिन अग्रवालला अटक करण्यासाठी संबंधित वृत्तवाहिनीच्या कार्यालयात पोहोचले. मात्र जुजबी चौकशी करुन अग्रवाल इमारतीत नसल्याचं सांगत पोलिसांनी काढता पाय घेतला.

 

त्यानंतर अगदी पाच मिनिटात कार्यक्रम संपला आणि पालकमंत्री गिरीष बापट खाली आले. त्यानंतर काहीच वेळात 'आपलं घर'चा प्रवर्तक सचिन अग्रवालही इमारतीखाली आला. त्यावेळी बापट आणि पोलिसांदेखतच त्याने तिथून एका दुचाकीवरुन पळ काढला.

 

त्यामुळे पुणे पोलिसांनी फक्त अग्रवालवर कारवाईचा फार्स केला का? वृत्तवाहिनीच्या कार्यालयात अशी काय जादू झाली की पोलिसांना अग्रवाल दिसला नाही? पोलीस गेल्यानंतर अग्रवाल त्याच इमारतीतून बाहेर कसा आला? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्यामुळे पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

 

पाहा व्हिडीओ : गिरीश बापट आणि पोलिसांदेखत पळून गेला