200 फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदल्यास कारवाई होणार
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2016 03:42 PM (IST)
मुंबई : दोनशे फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. सततचा दुष्काळ, खोलवर जाणारा भूजलसाठा, त्यामुळे वारंवार निर्माण होणारी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता बोअरवेलच्या खोलीवर नियंत्रण ठेवणाऱ्या महाराष्ट्र भूजल अधिनियमाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन चर्चा करण्यात आली आहे. शिवाय, अंमलबजावणीसाठी नियमावलीही तयार करण्यात येत आहे. बबनराव लोणीकर म्हणाले की, “जमिनीत जितके पाणी मुरते त्यापेक्षा अधिक पाणीउपसा करण्यात येत आहे. यापुढील काळात दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी बोअरवेलवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र भूजल अधिनियमाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. पण यामध्ये कायद्याच्या अंमलबजावणीबरोबर लोकसहभागही गरजेचा आहे. लोकांनी पुढाकार घेऊन पाणी अडविणे, पाणी जिरविणे याबरोबरच भूगर्भातील पाणी जतन करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत.”