मुंबई : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काहीही चर्चा न झाल्यानं 'सामना'तूनही सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदेच्या स्थितीवर ढाळलेल्या अश्रूंची दखल घेतली तर बरं होईल, असा खोचक टोलाही 'सामना'मधून मारण्यात आला आहे.
'देशाच्या राजकारणातले भीष्मपितामह लालकृष्ण अडवाणी यांनी संसदीय लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सत्ताधारी व विरोधक मिळून संसद चालू देत नसतील तर या सर्व प्रकारात रोज कोट्यवधींचा फक्त चुराडा होत आहे. लालकृष्ण अडवाणी हे काही काँग्रेसचे नेते नाहीत. काँग्रेसविरोधी राजकारणाचे ते प्रमुख सेनानी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.' अशा शब्दात 'सामना'च्या अग्रलेखातून सुनावण्यात आलं आहे.
'पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे संसदेच्या परिसरात प्रथम आले. आत शिरताना त्यांनी संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं. त्यांच्या डोळ्यात भावनावेगाने अश्रूदेखील वाहू लागले, पण गेल्या दोनेक वर्षांत संसदीय कार्याचा जो तमाशा झाला आहे त्यामुळे संसदेचा आत्माच हरवला व संसदेच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत आहेत.' अशी बोचरी टीकाही 'सामना'त करण्यात आली आहे.