मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मराठा मोर्चासंबंधी बडोलेंनी केलेल्या वक्तव्यावरुन जिभांना लगाम घालण्याची गरज असल्याचं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

'मोर्चे म्हणजे पैशांचा खेळ आहे, असं राज्याच्या एका मंत्र्याने सांगणं बरोबर नाही. महाराष्ट्राचे मंत्री बडोले यांनी केलेल्या विधानामुळे भाजपची पंचाईत झाली. बडोलेंनी हे विधान करुन मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. त्यामुळे आता बडोले यांच्या विरोधात मराठा समाजाचे लोक खवळून उठले आहेत.' अशा शब्दात 'सामना'च्या अग्रलेखातून बडोलेंचा समाचार घेण्यात आला आहे.

'जेवढ्या जिभा सैल, तेवढा सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका जास्त असतो. महाराष्ट्रात सध्या निघणारे मोर्चे हा आक्रोश आहे व फक्त पैसे खर्च केल्यानेच आक्रोशाला तोंड फुटते हे आम्हाला मान्य नाही. मराठा समाजाचे मोर्चे यशस्वी होतात याचे मुख्य कारण पैसा नसून शिस्त, माध्यमांचा नेटका वापर, यंत्रणा राबवणारा हात व मुख्य म्हणजे मनात उसळलेला संताप आहे.' असं म्हणत शिवसेनेने बडोलेंना फटकारलं आहे.