मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ‘मातोश्री’वर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र, मातोश्रीतून बाहेर पडताच पुन्हा ‘सामना’मधून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
‘महाराष्ट्राची सत्ता टिकेल पण काश्मीर टिकेल काय?’, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. दरम्यान, आज शिवसेनेचा 51वा वर्धापन दिवस आहे आणि वर्धापनदिनी मित्रपक्षावर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं आहे.
‘महाराष्ट्राचे सरकार हे प्राधान्य असता कामा नये. आश्वासनांच्या टोप्या लावून व या बोटावरील थुंकी त्या बोटावर करून ते टिकवले जाईलही, पण कश्मीर कसे टिकविणार आहात?’ असा सवाल विचार सामनातून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.
‘सामना’च्या अग्रलेखावर एक नजर:
* महाराष्ट्रातील मध्यावधीचे काय व्हायचे ते होईल, अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे मध्यावधीनंतर त्यांचेच सरकार येईल. त्यांना हवा तो राष्ट्रपती होईल. प्रत्येक निवडणुका तुम्ही जिंकाल व टिकाल, पण कश्मीरची लढाई जिंकणार काय? जवानांचे प्राण वाचतील काय? कश्मीर देशाच्या नकाशावर जवानांच्या बलिदानाशिवाय टिकेल काय? याचे उत्तर देशाला हवे आहे!
* राजकारणातील लढाया म्हणजे निवडणुका या जिंकण्यासाठीच असतात. त्यामुळे उद्या महाराष्ट्रात मध्यावधी झालीच तर ती जिंकण्याची भाषा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. अमित शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत व आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. अर्थात मध्यावधीचे काय होणार यापेक्षा आम्हाला चिंता आहे ती कश्मीरचे काय होणार? हिंसेच्या वणव्यात जळत असलेल्या दार्जिलिंगचे काय होणार? आमच्या भूमीवरील हे दोन्ही स्वर्ग आज हिंसा व दहशतवादाने खाक होताना दिसत आहेत. अनंतनाग जिल्ह्यात पोलीस पार्टीवर हल्ला करून सात पोलिसांना ठार करण्याचे भेकड कृत्य अतिरेक्यांनी केले आहे.
* पोलीस व जवान यांच्या हौतात्म्यांचे आकडे मोजायचे तरी किती, हा प्रश्न आमच्यापुढे आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील सरकारचे काय होणार, हा प्रश्न काहींना महत्त्वाचा वाटत आहे. महाराष्ट्रातील सरकारचा टेकू काढून घेतला तर पाठिंब्यासाठी पाच-पंधरा डोकी विकत घेऊन सरकार टिकविण्याची धडपड समजण्यासारखी आहे. फडणवीस यांचे सरकार पाच वर्षांसाठी टिकेलच टिकेल अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली आहे, पण देशाच्या नकाशावर कश्मीर टिकेल काय? व त्या भूमीवरील जवानांचे हौतात्म्य वाया तर जाणार नाही ना अशी चिंता राष्ट्रभक्तांना पडली आहे.
* जवानांवरील निर्घृण हल्ले वाढले आहेत. कश्मीरची भूमी रोज आमच्याच जवानांच्या रक्ताने न्हाऊन निघत आहे व ‘भारतमाता की जय’ अशी आरोळी ठोकणे हा तेथे गुन्हा ठरत आहे. कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या उघड उघड जवानांवर हल्ले करणाऱया तरुणांचे समर्थन करीत आहेत व कश्मीरातील परिस्थितीस जवानांना जबाबदार धरीत असतील तर तो आमच्या सैन्याचा अपमान आहे. महाराष्ट्रात शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरकस भूमिका घेते. राष्ट्रीय प्रश्नांवर स्वतंत्र व देशाच्या स्वाभिमानाचे मत मांडते म्हणून शिवसेनेस धडा शिकविण्याचे डावपेच आखले जातात, पण कश्मीरात ‘अराष्ट्रीय’ भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी भाजप समर्थपणे उभी आहे. मेहबुबांच्या बेलगाम अराष्ट्रीय वक्तव्यांवर ‘ब्र’ काढण्याची हिंमत परिवारातील लोक दाखवत नाहीत. कश्मीर टिकायला हवं.
* कश्मीर व दार्जिलिंग येथे हिंसाचार भडकला आहे. कश्मीरात अतिरेक्यांचा उच्छाद आहे तर दार्जिलिंग येथे स्वतंत्र ‘गोरखालॅण्ड’साठी हिंसक आंदोलन सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दार्जिलिंग येथे पोलिसांबरोबर निरपराध्यांचे बळी गेले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवूनही ते ऐकायला तयार नाहीत. आंदोलकांकडे सर्व प्रकारची हत्यारे आहेत. ईशान्येकडील उग्रवाद्यांकडून दार्जिलिंगमधील आंदोलकांना पाठबळ मिळत आहे व हा प्रकार गंभीर आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण दार्जिलिंगच्या पेटलेल्या होळीवर कोणी राजकीय पोळी भाजू नये इतकीच आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील मध्यावधीचे काय व्हायचे ते होईल, अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे मध्यावधीनंतर त्यांचेच सरकार येईल. त्यांना हवा तो राष्ट्रपती होईल. प्रत्येक निवडणुका तुम्ही जिंकाल व टिकाल, पण कश्मीरची लढाई जिंकणार काय? जवानांचे प्राण वाचतील काय? कश्मीर देशाच्या नकाशावर जवानांच्या बलिदानाशिवाय टिकेल काय? याचे उत्तर देशाला हवे आहे!
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरे-अमित शाहांची 'मातोश्री'वर बंद दाराआड दीड तास चर्चा
मातोश्रीवरील अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीतून दानवेंना वगळलं!
मध्यावधी झाल्याच तर मैदान सोडणार नाही : अमित शाह
राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत : अमित शाह