नवी दिल्ली : पुण्यात 2007 साली घडलेल्या ज्योतीकुमारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी फेटाळली आहे. दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.


22 वर्षीय ज्योती कुमारी चौधरी विप्रो कंपनीच्या बीपीओची कर्मचारी होती. 1 नोव्हेंबर 2007 रोजी ज्योतीकुमारीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिच्या कंपनीचा कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

शिक्षा सुनावल्यानंतर दोघांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथंही शिक्षा कायम राहिल्यानंतर गेल्या मे महिन्यात त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. मात्र, राष्ट्रपतींनीही त्यांचा दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे.

प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 2 महिन्यात संपणार आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी एकूण 30 दयेच्या याचिका फेटाळल्या. याआधी राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभा पाटील यांनी दयेच्या 34 अर्जांना मान्यता देऊन 3 अर्ज फेटाळले होते. तर ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी केवळ 1 दयेचा अर्ज फेटाळत एका अर्जासाठी क्षमादान दिले होते.