धावत्या एसटीचं चाक निखळलं, मोठी दुर्घटना टळली
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2018 09:10 AM (IST)
अहमदनगर जिल्ह्यात सकाळी सहा वाजता श्रीगोंद्यावरुन दौंडला जाताना सांगवी गावाजवळ एसटीचं चाक निखळलं. वाहकाच्या बाजूचं चाक गळून पडलं. तर दुसरं चाक अडकलेलं होतं.
अहमदनगर : धावत्या एसटीचं चाक निखळून मोठी दुर्घटना होता होता टळली. अहमदनगर जिल्ह्यात सकाळी सहा वाजता श्रीगोंद्यावरुन दौंडला जाताना सांगवी गावाजवळ एसटीचं चाक निखळलं. वाहकाच्या बाजूचं चाक गळून पडलं. तर दुसरं चाक अडकलेलं होतं. श्रीगोंदा आगाराच्या या बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी होते. जुनाट नट निखळल्याने चाक गळून पडलं. काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या टँकर चालकाने चाक गळून पडल्याची माहिती दिली. मागच्या एकाच चाकावर एसटी जवळपास दोन ते तीन किमी धावल्याची माहिती प्रवाशांनी दिली. यानंतर काही नागरिकांनी हे चाक बारामती एसटीत पाठवून दिलं. त्यानंतर एसटीला चाक बसवण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र नट नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. जीव वाचल्याचा प्रवाशांना आनंद झाला, मात्र भररस्त्यात थांबून मनस्ताप सहन करावा लागला. नगर-दौंड रस्त्याच्या निर्मितीचं काम सुरु आहे. त्यामुळे अजून काही अंतरावर गेल्यावर थोडक्यात अडकलेल्या चाकालाही धोका निर्माण झाला असता. अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वीही जामखेड आणि कर्जत तालुक्यात एसटीची चाकं निखळली होती. त्यामुळं एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.