बीड: सध्याची परिस्थिती पाहता मराठा आरक्षण हा संवेदनशील मुद्दा असल्याने, त्याबाबत कोर्टात चालू असलेली सुनावणी ही फास्ट ट्रॅक कोर्टात करावी, अशी मागणी भाजपचे  विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांनी केली. ते परळीत बोलत होते.


इतर संवेदनशील प्रकरणाप्रमाणेच मराठा आरक्षणाची सुनावणीही फास्ट ट्रॅक कोर्टात करा आणि निर्णय जाहीर करा, असं धस म्हणाले.

सुरेश धस यांनी काल परळीतील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आरक्षणासंदर्भातील खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याची मागणी केली.

गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत आंदोलन सुरु आहे. या समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी मी समाजासोबत आहे, असं धस म्हणाले.

"महाराष्ट्रात मराठा समाज 32 टक्के आहे. सध्या या समाजामध्ये चीड आहे. तरुण आक्रमक झाले आहेत. समाजमन हललं आहे. त्यामुळे हा विषय संवेदनशील झाला आहे. त्यामुळे अन्य संवेदनशील विषयावर जसा फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत तातडीने मार्ग काढला जातो, तसाच हे प्रकरणही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. यामुळे जो काही निर्णय येईल तो तातडीने येईल. तसंच सरकारने कोर्टात जे अडीच हजार पानी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, ते पण ऑनलाईन उपलब्ध करावं, जेणेकरुन सरकारची भूमिका सर्वांसमोर येईल", असं सुरेश धस म्हणाले.

दरम्यान, परळीच्या ठिय्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, भाई जगताप, आमदार सुरेश धस यांनी भेटी दिल्या.

धनंजय मुंडेंचं भाषण

यावेळी धनंजय मुंडे यांनीही काल परळीतील आंदोलकांची भेट घेऊन भाषण केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलं.

संबंधित बातम्या 

मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगली दौरा पुढे ढकलला?  

मराठा क्रांती मोर्चाकडून आजही अनेक जिल्ह्यात बंद  

EXCLUSIVE : मराठा आरक्षण विशेष संवाद : खासदार संभाजीराजे छत्रपती यांची खास मुलाखत