मनमाड : पळून जाणाऱ्या प्रेमी युगुलाच्या वाहनाच्या धडकेत एका शालेय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. नाशिकमधील सटाणा तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.


यज्ञेश रघुनाथ काकुळते असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच नाव आहे. यज्ञेश किकवारी या गावातील शाळेत जात असताना अपघात झाला.

सटाणा तालुक्यातील तळवाडे डिगरमध्ये एक प्रेमीयुगल चारचाकी वाहनाने पळून जात होतं. पळून चाललेलं प्रेमी युगुल एकमेकांचे नातेवाईक आहेत. मामाने नकार दिल्याने मुलगा मामाच्या मुलीला पळवून घेऊन चालला होता.

या युगुलाला गावातील एका व्यक्तीने पाहिल्यानंतर त्यांचा पाठलाग सुरु केला. पाठलाग होत असल्यामुळे युगुलाने त्यांची कार वेगात पळवली. त्याचवेळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांच्या कारने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळीच गाडी पेटवून दिली. याप्रकरणी मृत मुलाचे नातेवाईक सटाणा पोलीस ठाण्यात जमा झाले. या अपघातानंतर पोलिसांनी प्रेमी युगुलासह त्यांच्या 4 मित्रांना ताब्यात घेतलं आहे. तसंच गाडीचालकासह गाडी जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.