उस्मानाबाद : चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. मात्र या कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मोठ्या संकटात सापडला आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या अफवा यासाठी कारणीभूत ठरत आहे. चिकन खाल्याने कोरोनाचा लागण होते, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याचा परिणाम असा झाला की चिकनचे दर इतिहासात कधीच नव्हे एवढे कमी म्हणजे नऊ ते दहा रुपये किलो झाले आहेत.


कोरोनाच्या अफवांमुळे पोल्ट्री फार्मचा बाजार उठला आहे. राज्यात असंख्य शेतकरी आहेत, ज्यांनी शेतीला पर्याय म्हणून कुक्कुटपालन सुरु केलं, त्या शेतकऱ्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. बँकाकडून लाखोंचं कर्ज घेतलं, शेड उभारले, पिलांची जपणूक केली. परंतु कोरोना व्हायरस आला काय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.


पोल्ट्री व्यवसायात देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे 50 लाखांहून अधिक कोंबड्या विक्री अभावी पडून आहेत. तर संपूर्ण राज्यामध्ये दीड कोटी कोंबड्या विक्रीविना पडून असल्याची माहिती नाशिकचे आनंद अॅग्रोचे संचालक उद्धव आहिरे यांनी दिली आहे. त्यामुळे 8 दिवसांत महाराष्ट्रातील पोल्ट्रीचं तब्बल 600 कोटींचं नुकसान झालं आहे. तर आतापर्यंतच्या नुकसानाचा आकडा 900 कोटींच्या घरात गेला आहे.


तसेच राज्यभरात चिकनचे दर चाळीस रुपयांपर्यंत खाली आले आहेत. चिकनच्या दरात झालेल्या घसरणीने पोल्ट्री व्यावसायिकांना एका कोंबडीमागं फक्त 70 ते 90 रुपये मिळत आहेत. भाव कमी करुनही विक्री होत नसल्यानं कोंबड्यांचं काय करायचं असा प्रश्न आता पोल्ट्री व्यावसायिकांना पडला आहे.


अफवा पसरवणाऱ्यांचा शोध सुरु : सुनील केदार


चिकनमधून कोरोना व्हायरस पसरत नाही. अशा अफवा सोशल मीडियावर कशा आणि कुणी पसरवल्या याचा तपास आम्ही घेत आहोत. उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचे दोन आयडी सापडले आहेत. बाहेरच्या राज्यातील लॉबी आहे, ज्यांना महाराष्ट्रातील पोट्री व्यवसायाचं नुकसान करायचं आहे. लवकरच मुंबई आणि नागपुरात चिकन महोत्सव भरवणार असल्याची माहिती पशू संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.