बीड : मराठवाड्यात दुष्काळ तीव्र असल्यामुळे पाण्याचे छोटे-मोठे सगळे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. म्हणूनच बीडमध्ये कित्येक वर्षांपासून जमिनीच्या पोटात रहस्य होऊन राहिलेल्या अनेक गोष्टी आता बाहेर पडत आहेत. तब्बल 74 वर्षांपूर्वी बीडच्या आष्टीमधील रुटी तलावात अपघातग्रस्त झालेल्या विमानाचे काही अवशेष सापडले होते, आता हा प्रकल्प पूर्ण कोरड्या पडल्याने त्या विमानाचं इंजिन सापडलं आहे.

ही घटना आहे 74 वर्षांपूर्वीची... ऑगस्ट 1945 मध्ये दक्षिण दिशेने भरकटलेलं सैन्य दलाचं एक विमान इमर्जन्सी लॅंडिंग करताना रुटी मध्यम प्रकल्पातील तलावात कोसळलं होतं. या घटनेत एक वैमानिक तलावात बुडाला, तर दुसरा पाठीवर असलेल्या वॉकीटॉकीसह पोहत पाण्याबाहेर आल्याचं स्थानिक सांगतात.

प्रकल्पात पडलेलं हे विमान बाहेर काढण्यासाठी रुटी ग्रामस्थांनी 16 बैलगाड्या जोडून मोटेचा नाडा हातात घेतला होता. वसंत अष्टेकर आणि मुबारक चाऊस या दोघांनी पोहत जाऊन तो तलावातील विमानाला बांधला. परंतु शर्थीचे प्रयत्न करुनही विमान पाण्याबाहेर काढण्यात यश आलं नव्हतं.

2013 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात या प्रकल्पाचं पाणी पूर्ण आटलं होतं. त्यामुळे अपघातग्रस्त विमानाचा पंखा आढळून आला होता. आता 2016 पासून एक प्रकल्प पाण्याने भरलेला नाही. आता तर या उघड्या पडलेल्या प्रकल्पातून गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यातच सापडलेलं इंजिन सध्या पाटबंधारे विभागाच्या ताब्यात आहे.