बीड : बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. 'बस्स तू चलना मत छोडना... बस्स तू लढना मत छोडना...' या कवितेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.

बीड लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रीतम मुंडे सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा प्रीतम यांनी पराभव केला. लोकसभा निवडणूक निकालाच्या आठवड्याभरानंतर धनंजय मुंडे  माध्यमांसमोर आले. बीडमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

बजरंग सोनवणे यांना उद्देशून धनंजय मुंडे यांनी एक कविता म्हटली.

तू दौड मे अव्वल आये ये जरुरी नहीं..
तू सबको पीछे छोड दे, ये भी जरुरी नहीं..
जरुरी है तेरा दौड मे शामील होना..
जरुरी है तेरा गिरकर फिरसे खडा रहना..
जिंदगी में इम्तिहान बहोत होंगे
आज जो आगे है, कल तेरे पिछे होगा
बस तू चलना मत छोडना, बस तू लढना मत छोडना


धनंजय मुंडेंनी सोनवणे यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र ही कविता खुद्द धनंजय मुंडे यांनाही लागू पडते का, अशी चर्चा सुरु आहे.

धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना 'माझा'च्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्या होत्या. भाजप नेत्यांनी तीनशेच्या पुढे जागा जिंकू, हा केलेला दावा खरा ठरला. नेमके तेच आकडे येत असतील तर अभ्यास करावा लागेल, असं मुंडे म्हणाले होते.

बीडच्या नागरिकांनी पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना संधी दिली आहे. जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्या जोमाने प्रयत्न करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.