नागपूर : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या मुद्द्यावरुन विधान परिषदेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. दस्तुरखुद्द वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि सत्ताधारी आमदारच विधानपरिषदेच्या वेलमध्ये उतरले होते.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षातील आमदार अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशात सर्वाधिक कमी जागा असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

त्यानंतर आमदार पंडित यांना उत्तर देताना, मराठवाड्यामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील कोटा हा 1985 पासून असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. मात्र, यावर संतापलेल्या विरोधकांनी गोंधक घातला आणि या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे, अशी मागणी केली. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला.

शिक्षणमंत्री विनोद तावडे सतत बोलू द्यावे म्हणून मागणी केली, पण सभापतींनी तावडे यांना उत्तर देण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे गोंधळ होत सत्ताधारी आमदारही वेलमध्ये उतरले.

तेव्हा चक्क वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनही वेलमध्ये उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर रामदास कदम यांनी येऊन गिरीश महाजन यांना वेलमधून बाहेर काढलं. तेव्हा विरोधकांनी यावर आक्षेप घेतला. मंत्रीपण वेलमध्ये उतरतात, काय सुरु आहे? म्हणत विरोधकही वेलमध्ये उतरले. या सर्व गोंधळामुळे विधानपरिषद कामकाज 10 मिनिटासाठी तहकूब करावे लागले.

कोकण आणि उस्मानाबादेतही वैद्यकीय महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालयातील विभागीय आरक्षण या मुद्द्यावरुन मराठवड्याचे आमदार आक्रमक होत असताना, कोकणातील आमदारांनी पण कोकणात वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी मागणी केली. उस्मानाबाद आणि कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली.