पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीला (RSS) पुण्यात आजपासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघ परिवारातील 36 संघटनांचे 267 प्रतिनिधी उपस्थित आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून या बैठकीला प्रारंभ झाला.
या बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरूण कुमार, मुकुंदा आणि रामदत्त चक्रधर, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्या जोशी, सुरेश सोनी, व्ही. भागैय्या, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांचा समावेश आहे. भाजपकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा या बैठकीस उपस्थित राहिलेत. संघ परिवारातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांमध्ये संवाद रहावा यासाठी दरवर्षी अशी समन्वय बैठक घेण्यात येते. यावर्षी ही बैठक पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होते आहे.
तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय आणि सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी आचरण तसेच नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासंदर्भातही चर्चा होईल. संघटनेचा विस्तार आणि विशेष उपक्रमांच्या माहितीचेही आदानप्रदान करण्यात येईल. या बैठकीचा समारोप 16 सप्टेंबर रोजी होईल.
सामूहिक कामावर बैठकीत चर्चा होणार...
या बैठकीत या संघटना त्यांचे कार्य आणि त्यातील अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करतात. या निमित्ताने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. या सर्व संघटनांचे उद्दिष्ट आणि लक्ष्य समान आहे. अनेक संघटना विषयानुरूप आणि आवश्यकतेनुसार एकत्र येऊन कार्य करतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येऊन काम करतात. अशाप्रकारच्या सामूहिक कामावरही या तीन दिवसाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
शाळांना सुट्टी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय समन्वय बैठकीसाठी दोन शाळा आणि एक महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या आहेत. या शाळा आणि महाविद्यालयाच्या वर्गखोल्यांमध्ये स्वयंसेवकांची शाळा भरणार असल्याने, तेथे प्रत्यक्ष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस सुट्टी देऊन घरी राहण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune News : मराठा सकल मोर्चाकडून पुणे बंदची हाक; औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात शुकशुकाट