पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने आज बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं बघायला मिळत आहे.  संपूर्ण पुणे नाही तर पुण्यातील काही परिसरात बंद पुकारण्यात आला आहे. त्यात औंध, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या परिसरांचा समावेश आहे. त्यासोबतच एक दिवसांचं लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे. 


औंध, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सोबत अनेक व्यापाऱ्यांनीदेखील आपले दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय काही प्रमाणात शाळादेखील बंद आहे. सर्व मराठा सकल समाजाने एकत्र येत हा बंद पुकारला आहे. या परिसरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली, तर काही कॉलेजांनी या परिसरातील विद्यार्थी येऊ शकणार नसल्याने पेपर पुढे ढकलले आहेत आणि कंपन्यांनादेखील वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. 


मराठा क्रांती मोर्चाकडून सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण केलं जात आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर हे उपोषण केलं जाणार आहे. दरम्यान, शहराच्या मध्य भागासह इतर भागातील शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू आहेत.  शहरात आजपासून हिंदी भाषा संमेलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच प्रमुख चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.


PMPML बसेस पुण्यात सुरु आहेत. मात्र दुकानं, हॉटेल्स बंद ठेवण्यात आले आहे. व्यावसायिकांचा बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही फक्त आवाहन करत आहोत. सगळ्यांनी सहभागी होण्यासाठी कोणत्याही नागरिकांवर किंवा व्यावसायिकांवर बंद पुकारण्यासाठी जबरदस्ती करण्यात येणार नाही आहे. उत्स्फूर्तपणे ज्या नागरिकांना बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं, असं मराठा मोर्चांच्या सदस्यांकडून सांगण्यात आलं आहे. 


पोलिसांचा तगडा बंदोबस्त


या बंदमुळे आणि उपोषणामुळे शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरातील काही भागात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय मंडई परिसरातदेखील उपोषणाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी! अखेर 17व्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण