मुंबई : पहिल्यापासूनच राजकारणात यायचं हे ठरलं होतं, त्यामुळे लोकांच्या आपल्याकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार. आबांच्या निधनानंतर सुरू झालेला राजकारणातील प्रवास आता आमदारकीपर्यंत पोहोचला आहे असं नवनियुक्त आमदार रोहित पाटील यांनी सांगितलं. आजच्या राजकारणाकडे तरुण नकारात्मक नजरेने बघत असले तरी ही परिस्थिती कुणीतरी बदलली पाहिजे असंही रोहित पाटलांनी सांगितलं. राजकारण हा बदमाशांचा अड्डा होऊ नये यासाठी आपण राजकारणात कायम राहण्याचा निश्चय केल्याचं रोहित पाटील म्हणाले. रोहित पाटील हे देशातील सर्वात तरूण आमदार ठरले आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी राजकारणासह अनेक विषयांवर संवाद साधला.
राजकारणात का राहायचं ठरवलं?
सध्याचं आजूबाजूचं गलिच्छ राजकारण पाहिल्यानंतरही त्यामध्ये काम करावसं का वाटतं असा प्रश्न रोहित पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना रोहित पाटील म्हणाले की, "आर आर आबा या आधी माझा कट्टा कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी सागितलं होतं की राजकारणापासून चांगले लोक बाजूला राहिले तर तो बदमाशांचा अड्डा बनेल. राजकारणाला बदमाशांचा अड्डा बनवू द्यायचा नाही. त्यामुळेच राजकारणात राहायचा निर्णय घेतला."
आजच्या तरुणांची राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी जरी नकारात्मक असली तरी ती कुणीतरी बदलायला हवी. जुन्या लोकांनी राजकारणात जी संस्कृती टिकवली होती ती कायम ठेवायला हवी असं रोहित पाटील म्हणाले.
मला लोकांचे प्रश्न माहिती
रोहित पाटील म्हणाले की, "रोहित पवारांनी जी संघर्ष यात्रा सुरू केली होती त्यामध्ये चालताना अनेक प्रश्न लक्षात आले. बीडमध्ये जाताना एका लहाण मुलाला रोहित पवारांनी विचारलं की मोठं होऊन तुला काय व्हायचं आहे. त्यावर तो मुलगा म्हणाला की मला गवंड्याच्या हाताखाली काम करायचं आहे. त्याच्या आजूबाजूला जे दिसतं त्यावरून त्या मुलाने ते उत्तर दिलं. त्यावर इथल्या लोकांचे, मुलांचे प्रश्न लक्षात आले. हे सर्व प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करणार आणि या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार."
मला माझ्या मतदारसंघातील द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न माहिती आहेत, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काय माहिती आहेत. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न माहिती आहेत. त्यामुळे यावर काम करणार असल्याचं रोहित पाटील म्हणाले.
काकांनी दिलेला सल्ला तंतोतंत पाळला
रोहित पाटील म्हणाले की, मी 15 व्या वर्षी असताना आबा गेले. त्यानंतर महाविद्यालयाचं शिक्षण घ्यायला मुंबईला जायचं ठरलं. त्यावेळी राजकारणात यायचं हेच ठरलं होतं. पण त्यावेळी काका आणि जवळच्या लोकांनी मोलाचा सल्ला दिला. काय करायचं नाही हे ठरव असं त्यांनी सांगितलं. ते तंतोतंत पाळलं. त्या काळात वाचन केलं आणि इतर कामात स्वतःला व्यस्त ठेवल्याचं रोहित पाटलांनी सांगितलं.
माझा जन्म झालेल्या वर्षीच आबा ग्रामविकास मंत्री झाल्याचं रोहित पाटलांनी सांगितलं. जसं हळूहळू मोठं व्हायला लागलो तसं त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटायची.आईचं काम हलकं व्हावं म्हणून काम करू लागलो. त्यानंतर सुरू झालेला प्रवास आतापर्यंत आला आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून घराघरात प्रचार करण्याची संधी मिळाली. त्यातून काम करत गेलो. अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर ते कामं करायचे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या असं रोहित पाटील म्हणाले. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत गेलो आणि त्यांनी आता आमदार केलं असंही त्यांनी सांगितलं.
आबा काय होते हे त्यावेळी समजलं नाही
आबांना मासे खायला आवडायचे. शोले चित्रपट पाहताना सगळ्या मुलांना एकत्र करायचे आणि खाण्याचा बेत करायचे. आबा काय होते हे त्यावेळी आम्हाला कळलं नाही. पण आता एखाद्या मंत्र्याची अपॉइंटमेंट मागताना आपले वडील काय होते हे कळतंय असं रोहित पाटील म्हणाले.
या संबंधित बातम्या वाचा:
- Rohit Patil : काही झालं तरी म्हाताऱ्याला सोडायचं नाही, नाहीतर घरात घेणार नाही; रोहित पाटलांना आजीचा पहिल्याच दिवशी दम
- Rohit Patil : अजित पवारांनी आबांवर तो आरोप का केला माहिती नाही, पण त्यामुळे वेदना झाल्या; रोहित पाटील काय म्हणाले?