मुंबई : राष्ट्रवादी फुटल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, जुन्या जाणत्यांचा सल्ला घेतला आणि पवार साहेबांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. पवार साहेबांचे तासगाव मतदारसंघावर मोठे उपकार असल्याने त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असं दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव आणि नवनियुक्त आमदार रोहित पाटलांनी सांगितलं. या सगळ्यात पहिला आपल्या आजीने सांगितलं होतं की काही झालं तरी पवार साहेबांना सोडू नकोस अशी आठवणही त्यांनी सांगितली. रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आर आर पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला. 


शरद पवारांसोबत का राहिले? 


राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पाटलांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर बोलताना रोहित पाटील म्हणाले की, "काही झालं तरी म्हाताऱ्याची साथ सोडू नकोस. नाहीतर घरात घेणार नाही असा दम माझ्या आजीने पहिल्याच दिवशी दिला. तसेच आपल्या चुलत्यांनाही तसाच दम तिने दिला. त्यानंतर आपल्या मतदारसंघातील लोकांची भावना काय आहे हे अनेकांनी सांगितलं. त्यासंबंधी अनेकांशी चर्चा केली."


लोकांशी चर्चा केल्यानंतर आपण आरेवाडीला गेलो होतो. त्यावेळी रोहित पवार आणि पवार साहेबांचा फोन आला. दुसऱ्या दिवशी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या ठिकाणी ते येणार होते. त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील दोन हजार कार्यकर्त्यांना घेऊन आपण पवार साहेबांची भेट घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली असं रोहित पाटील यांनी सांगितलं. 


पवार साहेबांचे आपल्या मतदारसंघावर मोठे उपकार असल्याचं सांगत रोहित पाटील म्हणाले की, "पवार साहेबांनी कर्जमाफी केली. त्यामुळे आपल्या भागातील उद्ध्वस्त होण्याची शक्यता असलेले अनेक शेतकरी वाचले. अनेकांची कर्जमाफी झाली. आपल्या मतदारसंघात 40 पेक्षा जास्त कोल्ड स्टोरेज आहेत. या ठिकाणी बेदाण्यांची 2000 कोटींची उलाढाल होते. त्यामुळेच पवार साहेबांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला."


हवेत जात असेल तर आजी जमिनीवर आणते


आपली आजी ही 90 वर्षांची असली तरी आजही शेतात जाते असं रोहित पाटील म्हणाले. आजीचा स्वभाव थेट असून तिच्याकडे प्रसंगावधान मोठं आहे. त्यामुळे घरातील एखादा व्यक्ती पाच फूट जरी हवेत गेला तरी त्याला जमिनीवर आणायचं काम आजी करते असंही रोहित पाटील म्हणाले. 


आर आर आबांच्यासोबत काम केलेला एखादा व्यक्ती आजही भेटायला आला तरी आजी त्याला पाहून रडते अशी आठवण रोहित पाटलांनी सांगितली.  


आबा काय होते हे त्यावेळी समजलं नाही


आबांना मासे खायला आवडायचे. शोले चित्रपट पाहताना सगळ्या मुलांना एकत्र करायचे आणि खाण्याचा बेत करायचे. आबा काय होते हे त्यावेळी आम्हाला कळलं नाही. पण आता एखाद्या मंत्र्याची अपॉइंटमेंट मागताना आपले वडील काय होते हे कळतंय असं रोहित पाटील म्हणाले. 


ही बातमी वाचा: