मुंबई : विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपल्यावर अनेक आरोप करण्यात आले. पण त्याला लोकांनीच उत्तर दिलं. पण अजितदादांनी आर आर आबांवर जो आरोप केला त्यामुळे एक कार्यकर्ता आणि कुटुंबातील व्यक्ती म्हणून वेदना झाल्या असं नवनियुक्त आमदार रोहित पाटील म्हणाले. यावेळी रोहित पाटलांनी आर आर पाटलांच्या अनेक आठवणीही जाग्या केल्या. देशातील सर्वात तरुण आमदार ठरलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.
दादांच्या आरोपामुळे वेदना झाल्या
विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यावर आरोप केला होता. त्याचा या निवडणुकीवर किती परिणाम झाला असा प्रश्न विचारला असता रोहित पाटील म्हणाले की, "आबा रुग्णालयात असताना त्यांना भेटायला आलेल्या अजित पवारांना मी पहिल्यांदा पाहिलं होतं. त्या दोघांची अंडरस्टँडिंग वेगळं होतं. कुटुंबीय म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून दादांच्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या. आबा गेल्यानंतर दादांनी हे वक्तव्य केल्यामुळे वाईट वाटलं. पण दादा सिनीअर आहेत, त्यामुळे त्यांना उत्तर देणं मला योग्य वाटलं नाही."
विरोधक खालच्या पातळीवर गेले, लोकांनी उत्तर दिलं
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फराळ आणि पैसे वाटप केल्याचा आरोप रोहित पाटलांवर झाला होता. त्यावर बोलताना रोहित पाटील म्हणाले की, "आपले विरोधक कोणत्या पातळीवर जाऊ शकतात हे या निमित्ताने आम्ही पाहिलं. एखाद्या घरात काही झालंच तर सांत्वनपर फराळ हा आमच्या घरातून जातं. यावेळी निवडणुकीच्या दरम्यान दिवाळी होती. म्हणून आधीच, दसऱ्याच्या वेळी फराळ वाटला होता. पण दिवाळीच्या दिवशी फराळ कोण वाटला हे नंतर समोर आलं. त्यावर त्याच दिवशी आरोप करणाऱ्यांनी पोलिसांसमोर खुलासा केला. त्यावर आपणही पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून यावर कारवाई करण्याची विनंती केल्या. इतर रोहित पाटलांच्या नावावर असलेल्या जमिनी आपल्या नावावर असल्याचा प्रचार करण्याचा प्रचार करण्यात आला."
आबांवरती पहिल्या निवडणुकीच्या दरम्यान 302 चा गुन्हा दाखल करण्याचा प्रकार याच विरोधकांनी केला होता. त्यानंतर आबांवर दोन तीन वेळा हल्लाही केला होता. पण तरीही लोकांनी आबांना निवडून दिलं अशी आठवण रोहित पाटील म्हणाले.
काकांनी दिलेला सल्ला तंतोतंत पाळला
रोहित पाटील म्हणाले की, मी 15 व्या वर्षी असताना आबा गेले. त्यानंतर महाविद्यालयाचं शिक्षण घ्यायला मुंबईला जायचं ठरलं. त्यावेळी राजकारणात यायचं हेच ठरलं होतं. पण त्यावेळी काका आणि जवळच्या लोकांनी मोलाचा सल्ला दिला. काय करायचं नाही हे ठरव असं त्यांनी सांगितलं. ते तंतोतंत पाळलं. त्या काळात वाचन केलं आणि इतर कामात स्वतःला व्यस्त ठेवल्याचं रोहित पाटलांनी सांगितलं.
माझा जन्म झालेल्या वर्षीच आबा ग्रामविकास मंत्री झाल्याचं रोहित पाटलांनी सांगितलं. जसं हळूहळू मोठं व्हायला लागलो तसं त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटायची.आईचं काम हलकं व्हावं म्हणून काम करू लागलो. त्यानंतर सुरू झालेला प्रवास आतापर्यंत आला आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून घराघरात प्रचार करण्याची संधी मिळाली. त्यातून काम करत गेलो. अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर ते कामं करायचे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या असं रोहित पाटील म्हणाले.
तासगाव नगरपालिका असो वा बाजार समितीची निवडणूक असो, सगळे विरोधक आपल्याविरोधात एकत्र यायचे. तसेच या विधानसभेलाही सगळे विरोधक एकत्र आले. आधीचा कामाचा अनुभव असल्याने त्याला तोंड दिलं आणि निवडणूक जिंकलो. ज्या ठिकाणी लोकांनी मतदान केलं त्या ठिकाणी आमचा विजय झाला.
आबा काय होते हे त्यावेळी समजलं नाही
आबांना मासे खायला आवडायचे. शोले चित्रपट पाहताना सगळ्या मुलांना एकत्र करायचे आणि खाण्याचा बेत करायचे. आबा काय होते हे त्यावेळी आम्हाला कळलं नाही. पण आता एखाद्या मंत्र्याची अपॉइंटमेंट मागताना आपले वडील काय होते हे कळतंय असं रोहित पाटील म्हणाले.