बीड : सातवीत शिकणाऱ्या मुलाने हजेरी पटावरच्या रजिस्टरवरुन स्वतःची जात खोडली. जात अस्तित्वातच नसावी, असं त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याने शाळेतील हजेरीपट गुपचूप मिळवला आणि त्यातील जात आणि धर्मच पेनने खोडून टाकला.
रोहन भोसले हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतो. शाळेतील सर्वात हुशार मुलगा म्हणून रोहनची ओळख आहे. देव धर्म तो मानत नाही, हे सर्वश्रुत आहे.
शाळेतील हजेरी पटावर जात आणि धर्माचा कॉलम आहे. विद्यार्थ्यांच्या नावासमोर ते स्पष्ट लिहिले जाते, मात्र रोहनने याचाच विरोध केलाय. शाळेची मधली सुट्टी झाली तेव्हा रोहन वर्गात गेला. त्याच्याकडे पेन नव्हता, मात्र वर्गमैत्रीणीकडून त्याने पेन घेऊन हजेरी पटावरील त्याची जात पेनने खोडून टाकली.
आपल्या मुलाने जात खोडल्याचं रोहनच्या आई वडिलांना समजलं तेव्हा त्यांनी धसका घेतला होता. मात्र शिक्षकांनी रोहनने योग्य केल्याचं सांगताच त्याना धीर आला. रोहन शाळेतून घरी आल्यावर अभ्यास करतो शिवाय शेतीच्या कामात वडिलांना मदतदेखील करतो. रोहनच्या घरी टीव्ही नाहीये, त्यामुळे अधूनमधून कार्यक्रम पाहण्यासाठी तो शेजारच्या घरात जातो. मात्र कीर्तन ऐकणं, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे विचार तो नेहमी घरी सांगतो, असं त्याचे आई-वडील सांगतात.
शिक्षक आणि गावकऱ्यांचाही पाठिंबा
शिक्षकांनी दुसऱ्या दिवशी हजेरीपट हातात घेतल्यावर हा प्रकार शिक्षकांच्या लक्षात आला. मात्र त्याच्या या कृत्याने शिक्षक नाराज न होता भारावून गेले आहेत. शाळेत दिला जाणारा अभ्यास, संस्कार आज कामी आल्याचे सांगत आम्हाला रोहनबद्दल अभिमान असल्याचे शिक्षक सांगतायेत. एवढच नाही तर रोहनचा हा संकल्प राज्यात राबविण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न करु, असं शिक्षक सांगतात.
रोहन सध्या फक्त 13 वर्षांचा आहे, या वयात त्याने दाखवलेली धर्मनिरपेक्षता ही जात-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सणसणीत चपराक आहे. त्यामुळे पारगाव ग्रामपंचायतही आता रोहनच्या या विचाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणार आहे. विद्यार्थ्यांच्या हजेरी पटावरुन जात काढून टाकण्यासाठी पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेण्यात येणार आहे, असं सरपंचांनी सांगितलं.