कोल्हापूर : गुजरातच्या एम माधव या कुरिअर कंपनीच्या 30 लाख रुपये असणाऱ्या हवाल्याच्या रकमेवर अज्ञात तिघा चोरट्यांनी कोल्हापुरात जबरी चोरी करत डल्ला मारला आहे. एम माधव या कुरिअर कंपनीच्या सांगली ब्रांच ऑफिसमधून 30 लाखांची हवाल्याची रक्कम घेऊन एक कर्मचारी काल रात्री कोल्हापूरला आला होता. यावेळी स्टेशन रोड वरील हॉटेल राधाकृष्ण समोर हा प्रकार घडला.

 

विशेष म्हणजे शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून जबरी चोरीच घटनास्थळ हे हाकेच्या अंतरावर आहे. अशा ठिकाणी नागरी वस्तीत जबरी चोरी झाल्याने नागरिकांच्यात भीतीच वातावरण पसरले आहे.

 

मूळचे गुजरात मधील रहिवाशी असणारे अरुनभाई सुतार हे सांगलीच्या एम माधव या गुजरातच्या कुरिअर कंपनीत नोकरी करतात. सुतार हे काल रात्री सांगली वरून 30 लाखांची हवाल्याची रोख रक्कम घेऊन एसटीने कोल्हापूरला आले होते. यावेळी सुतार हे एस टी वर उतरल्यावर त्यांना घेण्यासाठी दुचाकीवरून कोल्हापूर ऑफिसचा कर्मचारी आला होता. स्टेशन रोड वरून हॉटेल राधाकृष्ण समोर असणाऱ्या रोडवर अज्ञात तिघांनी पैसे घेऊन आलेले सुतार यांना मारहाण करत 30 लाखांची रोकड घेऊन दुचाकी वरुन पोबारा केला.

 

या घटनेची माहिती सुतार यांनी पोलिसांना लगेच देने बंधनकारक होत . परंतु तसं न करता या घटनेची  माहिती घटना घडल्यावर तब्बल 6 ते 7 तासांनी सुतार यांनी पोलिसांना दिली. ही जबरी चोरी शाहूपुरी पोलीस ठाण्या नजीकच घडली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रदीप देशपांडे यांनी पाहणी केली. आणि तपासा बाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

 

घटनास्थळी सीसीटीव्ही असून पोलीस यामध्ये आरोपी दिसतात का याची देखील पाहणी करत आहेत.या जबरी चोरीची फिर्याद अरुणभाई अमृतभाई सुतार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली असून तपासासाठी 4 पथकं नजीक च्या राज्यात रवाना करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 

गेल्या दोन महिन्यातच कुरिअर कंपनीच्या रकमेवर चोरीचा हा दुसरा प्रसंग असल्याने कोल्हापूर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.