बीड : दक्षिण भारतात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये बीड आणि लातूरचे 78 भाविक बालंबाल बचावले. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यमच्या घाटांमध्ये 36 भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळताना वाचली, तर तामिळनाडूत बसला लागलेल्या आगीतून 42 जण सुखरुप बचावले. या दोन्ही अपघातात बचावलेले भाविक हे बीड आणि लातूर जिल्ह्यातले होते.


दोन धाम तीर्थयात्रेवर निघालेल्या लातूर जिल्ह्यातल्या भाविकांच्या खाजगी बसला आग लागली होती. या बसमध्ये असलेले लातूरच्या निलंगा निटूर रेणापूर तसेच बीडच्या अंबाजोगाई परिसरातले एकूण 42 भाविक सुदैवाने सुखरुप बचावले.

तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरचे दर्शन घेऊन इंदूरच्या अन्नपूर्णा ट्रॅव्हल्सची ही बस निघाली. बंगळुरु-कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरुन ही बस भाविकांना घेऊन कन्याकुमारीला निघाली होती. पहाटे चार वाजताच्या सुमारास तामिळनाडूतील दिडिंगलजवळ या बसने अचानक पेट घेतला.

ही आग इतकी भीषण होती की यात गाडीतले सगळे सामान जळून खाक झालं. यामध्ये बस, सात लाख रुपये, भाविकांचे कपडे आणि स्वयंपाकासाठी नेलेले साहित्याचा समावेश आहे. या भाविकांच्या अंगावर केवळ कपडे उरले होते. जवळच्या ग्रामस्थांनी या भाविकांच्या निवासाची आणि भोजनाची सोय केली.

दुसरी घटना आंध्रप्रदेशात श्रीशैलमच्या घाटात घडली. केवळ बसच्या दोन टायरवर ही बस दरीत कोसळता-कोसळता वाचली. या बसने बीड जिल्ह्यातल्या परळीमधले 36 भाविक श्रीशैलमसाठी निघाले होते.

बसने काल सकाळी सहाच्या सुमारास श्री शिंदेंच्या दोरणाला फॉरेस्ट विभागाचा टोलनाका पार केला. चिन्नाररुट वनक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर घाटातून जात असताना बसचे ब्रेक निकामी झाले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकली. बस घाटातून खाली दरीत कोसळत असतानाच अचानक थांबली. या घटनेचा थरार इतका भीषण होता की बसच्या मागच्या दोन चाकावर ती उभी राहिली या बसमध्ये असलेले 36 प्रवासी बचावले.