कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव अखेर मंजूर झाला आहे. प्रचंड गोंधळात मतदानाच्या माध्यमातून 47 विरुद्ध 32 मतांनी ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे आता दारु दुकानांना अभय मिळालं आहे.

सर्वसाधारण सभेत गदारोळ

कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रस्ते हस्तांतरणावरुन मोठा गदारोळ झाला होता. केवळ महसुलासाठी महापौर रस्ते ताब्यात घेत असल्याचा आरप विरोधकांनी केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकामध्ये हाणामारी झाली.

दोन्ही गटातील नगरसेवकांमध्ये हाणामारी

शहरातील रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी महापौर हसीना फरास यांनी सर्वसाधारण सभेत ठराव मांडला. या ठरावाला भाजप आणि ताराराणी आघाडीने तीव्र विरोध केला. याच मुद्द्यावरुन दोन गटातील नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी झाली. हे प्रकरण हाणामारीवर गेले.

भाजपचे नगरसेवक कमलाकर भोपळे आणि काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर महापौरांनी सभा अर्धा तास तहकूब केली.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून 500 मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारची मद्यविक्री न करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. या निर्णयातून पळवाटा काढण्यासाठी महापालिकांनी आपल्या क्षेत्रात येणारे रस्ते महापालिकांच्या ताब्यात घेण्याची शक्कल लढवली आहे. असाच प्रकार कोल्हापुरात पाहायला मिळाला.

कोल्हापुरातील रस्ते आता महापालिकेच्या ताब्यात आल्याने मद्यविक्री करणाऱ्यांचे फावणार आहे. त्यामुळेच विरोधकांनी या ठरावाला कडाडून विरोध केला होता.

...तर महापौरांना काळं फासू, तृप्ती देसाईंचा इशारा

एकीकडे भूमाता ब्रिगेड राज्यभर दारु मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडं कोल्हापुरात दारु दुकान बंद असताना ती सुरु करण्यासाठी कोल्हापूर महापालिका झटत आहे. त्यामुळं कोल्हापूरचे रस्ते हस्तांतरण केल्यास महापौर हसिना फरास यांना काळे फासू असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

पाहा व्हिडीओ :