'मुंबई पालिकेची सत्ता आमच्या हातात देऊन बघा'
'शिवसेना भाजप दोन्ही पक्ष सातत्याने टीका करत आहेत. दोन्ही पक्ष गेली अनेक वर्ष सत्तेत आहेत. त्यांना आताच का एकमेकांचा भ्रष्टाचार दिसतो आहे?, आम्ही पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई ही शहरं बघा कशी घडवली आहेत. आज मी 4 वाजता दक्षिण मुंबईतून निघालो आणि मालाडला 6 वाजता पोहचलो. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. इकडे कचऱ्यामध्ये भ्रष्टाचार चालतो, गावकडची माणसं इकडे आल्यावर मत शिवसेनेला देतात आणि गावाला आल्यावर राष्ट्रवादीला मत देतात.' असं अजित पवार म्हणाले.
'या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे'
'या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.'अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेवर केली आहे. अजित पवारांनी मुंबई पालिकेतील कारभारासोबतच राज्यातील कारभारावरही टीका केली. 'राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहे. अशावेळी सरकारनं कोर्टाकडे वेळ मागितला. बैठकीत ठराव वैगरे मांडणं वैगरे सुरु आहे. पण याप्रकरणी चालढकल सुरु आहे. त्यामुळे या सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.' अशी टीका करत पवारांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
'या सरकारनं जाहिरातबाजीत खर्चाचा विक्रम मोडला असेल'
राज्यात दोन वर्षे सरकारला पूर्ण होत आहेत. राज्यातील शिक्षक समाधानी नाही, शेतकरी समाधानी नाही, कायदा सुव्यस्था नाही. मेक इन महाराष्ट्र ही तर फक्त जाहीरातबाजी आहे. सरकारच्या कामगारविरोधी धोरणं यामुळे कारखाने बंद पडत आहेत. माझा तर दावा आहे की गेल्या 15 वर्षात आम्ही जेवढा खर्च जाहिरातीवर केला नाही त्यापेक्षा जास्त खर्च या सरकारनं या दोन वर्षात करुन एक विक्रम रचला असेल. अशीही त्यांनी टीका केली.
'यांचेच नेते म्हणतात, अच्छे दिन हे गळ्यात अडकलेलं हाडूक'
'सत्तेत आल्यानंतर हे सरकार दिलेली आश्वासनं विसरुन गेले, त्यामुळे त्यांचेच नेते म्हणतात की, अच्छे दिन हे गळ्यात अडकलेलं हाडूक आहे. हे काही मी बोलत नाही. त्यांचेच मंत्री म्हणतात. शिवसेनेचे अनेक खासदार म्हणतात की, पूर्वीच्या सरकारमध्ये आमची कामं तरी होत होती. दुसरीकडे अनेक आमदार आणि नेत्यांचं देखील हेच म्हणणं आहे.' असा दावा अजित पवारांनी केला आहे.
'गुंड थेट 'वर्षा'वर कसे पोहचतात?'
'निवडणुकीच्या तोंडावर भाजपत गुंडांचा समावेश होतो आहे. 'वर्षा' बंगल्यावरील तीन-तीन गेट ओलांडून गुंड आत कसे जातात, पोलिसांनी कोणाला आवरावं, निव्वळ निवडणुका जिंकण्यासाठी गुंडांना प्रवेश दिला जातो आहे.' अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली.
'विरोधाला विरोध करणार नाही'
'समाजात तेढ निर्माण व्हावा म्हणून काहीजण जाणूनबुजून विधानं करतात. दुसरीकडे यांचेच मंत्री ट्विटरवर नाराजी व्यक्त करतात. पण आम्ही विरोधाला विरोध करणार नाही, पण या सरकारची काम करण्याची इच्छा नाही. आता किमान उरलेल्या तीन वर्षात तरी यांनी कामं करावी.' असंही पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे:
- नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आम्ही उत्तमरित्या चालवतो आहोत, मुंबईचा विकास करण्यात शिवसेना अपयशी: अजित पवार
- कामगारविरोधी धोरण असल्याने अनेक कारखाने बंद होत आहेत: अजित पवार
- मेक इन महाराष्ट्र सारख्या गोष्टी म्हणजे फक्त जाहिरातबाजी: अजित पवार
- आघाडी सरकारनं 15 जाहिरातींवर जेवढा खर्च केला नसेल त्यापेक्षा जास्त खर्च या सरकारनं दोन वर्षात केला आहे: अजित पवार
- युती सरकारच्या दोन वर्षानंतरही जनता असमाधानी: अजित पवार
- मराठा आरक्षणाबाबत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा: अजित पवार
- ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, तडीपारीचे गुन्हे आहेत अशी लोकं 'वर्षा'वर कसे पोहचतात?: अजित पवार
- मराठा आरक्षणासंबंधी हायकोर्टात सरकारनेच आणखी वेळ मागितली: अजित पवार
- कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी: अजित पवार
- त्यांचेच नेते म्हणतात की, अच्छे दिन हे गळ्यात अडकलेलं हाडूक आहे: अजित पवार
- सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे : अजित पवार
VIDEO: