मुंबई : नागपुरातील तीन वेगवेगळ्या भागात तिघा जणांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु असून उष्माघातानं या तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासुन राज्यभरातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विदर्भातला पारा तर 45 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे ही अतिउष्णता तिघांच्या जीवावर बेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, धुळ्यात बुधवारी दुपारी 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गेल्या 13 वर्षांतील हे सर्वोच्च तापमान आहे. रविवारी धुळ्यात पारा 44 अंशांवर पोहचला होता. त्यानंतर दोनच दिवसात पाऱ्यानं पंचेचाळीशी गाठली आहे. उन्हाच्या तडाख्यानं धुळ्यातील दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून लोकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
अकोल्यात सात माकडांचा मृत्यू :
अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे सात माकडांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे माकडं मृत्युमुखी पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अकोल्यात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे 2011 नंतरचं सर्वाधिक तापमान असल्याची नोंद
आहे.
तापमान वाढण्याची शक्यता :
राज्यभर सध्या उन्हाच्या झळांना नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे. राज्यातील अनेक ठिकाणचा पार चाळीच्या पुढे गेल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत. या तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
विशेषतः विदर्भात पुढच्या 48 तासात तापमान 47 अंशावर पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी भरदुपारी घराबाहेर पडू नये असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे.