पुणे: रोख रक्कम आणि महागड्या वस्तूंची लाच घेताना अनेक सरकारी बाबू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याचं आपण पाहिलं आहे. पण पुण्यातल्या मावळमधील महावितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याने लाचेच्या स्वरुपात चक्क सिलिंग फॅन मागितल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. सहकारी उकाड्याने हैरान झाल्याने कार्यालयात फॅन बसविण्यासाठी ही लाच मागितल्याचं या महाशयांचं म्हणणं आहे.   राजेश हिंगणकर असं या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.   एका ठेकेदाराला मीटर बसवून देण्यासाठी हिंगणकर यांनी सिलिंग फॅनची मागणी केली होती. हा फॅन स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी त्याला रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी मावळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदा उन्हाच्या पाऱ्याने अनेकदा चाळीशी पार केल्याने सर्वच जण उकाड्यामुळे हैराण झालेत. उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी फॅन, एसीचा सहारा घेतात. मात्र हा एसी आणि फॅन अखंडीतपणे चालावा, यासाठी सुरळीत वीज पुरवठा देणाऱ्या महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांना मात्र फॅनअभावी उकाड्याने त्रस्त व्हावं लागतंय. म्हणूनच महाशय सहाय्यक अभियंत्याने लाचेच्या स्वरुपात चक्क फॅन मागितल्याचा आरोप आहे. मावळ महावितरण विभागात सहाय्यक अभियंता राजेश हिंगणकर यांच्यासह ५ ते ६ कर्मचारी इथे काम करतात. परंतु हिंगणकर यांची केबिन वगळता इतर केबिनमध्ये फॅनच नाही. त्यामुळे त्या केबिनमध्ये बसणारे कर्मचारी आणि इथे येणाऱ्या नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो.   त्यामुळे या केबिनमध्ये फॅन बसवणे गरजेचे होते. यासाठी हिंगणकर महाशयांनी मुख्य कार्यालयाकडे याची मागणी करण्याऐवजी चक्क लाचेच्या स्वरुपातच फॅन मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सरकारी बाबूंकडून वाढत चालेल्या भ्रष्टाचारामुळे दिवसेंदिवस सरकारी यंत्रणा पोखरली जात आहे. अशातच केवळ दोन हजार रुपयांच्या फॅनसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सहाय्यक अभियंता अडकल्याच्या या घटनेने तर सरकारी यंत्रणेची अब्रूच वेशीवर टांगली.