बार्शीः सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये प्रचंड जल्लोषाने गजबजून गेलं होतं. रिओ ऑलम्पिकमध्ये निवड झाल्यानंतर प्रथमच प्रार्थना ठोंबरे गावात आली. गावाचं नाव जगभरात गाजवणाऱ्या बार्शीकन्येचा गावानेही यथोचित सन्मान केला.


 

बार्शीच्या प्रमुख रस्त्यावरून उघड्या जीपमधून प्रर्थानाची जंगी मिरवणूक निघाली. हजारो बार्शीकरांनी या स्वागत सोहळ्यात सहभागी होऊन ठेका धरला. बार्शी नगरपालिकेनेही प्रर्थानाला मानपत्र देऊन गौरव केला.

 



 

रिओ ऑलिम्पिकमध्ये निवड झाल्यानंतर टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे पहिल्यांदाच बार्शीत दाखल झाली. यावेळी अवघ्या बार्शीकरांनी प्रार्थनाचं जल्लोषात स्वागत केलं. गावकऱ्यांनी दिलेला हा सन्मान पाहून प्रार्थनाही गहिवरुन गेली. रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेली निवड ही माझ्या कुटुंबाची आहे, अशी भावना प्रार्थनाने व्यक्त केली.

 

प्रार्थना ठोंबरेसाठी काढण्यात आलेल्या या जंगी मिरवणुकीत शाळा-कॉलेजातले विद्यार्थी, तसेच आबालवृद्धांनीही मोठी गर्दी केली होती. प्रार्थनाला कुणी पेढे भरवत होतं, तर कुणी पुष्पगुच्छ देऊन तिला शुभेच्छा देत होतं.  बार्शीचं नाव जगात गाजवणाऱ्या प्रार्थनाचा नगरपालिकेकडूनही गौरव करण्यात आला.

 

प्रार्थनाचा बार्शी ते रिओ ऑलम्पिकपर्यंचा प्रवास गावातल्या तरुणाईला प्रेरणा देणारा आहे. बार्शीतल्या तरुणाईने प्रार्थनाचं जोरदार स्वागत केलं. मिरवणूकीतला तरुणाईचा उत्साह हा प्रार्थनाला प्रोत्साहीत करणारा होता.

 



 

प्रार्थना सध्या हैदराबादमधल्या सानिया मिर्झा टेनिस अकादमीत इम्रान मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.  21 वर्षांच्या प्रार्थनानं आजवर आयटीएफ स्पर्धांमध्ये एकेरीत पाच, तर दुहेरीत दहा विजेतीपदं मिळवली आहेत.

 

याच कामगिरीमुळं भारताची नंबर वन टेनिसस्टार सानिया मिर्झानं रिओ ऑलम्पिकसाठी प्रार्थनाला पहिली पसंती दिली. त्यामुळं आता प्रार्थनासमोर सानिया मिर्झाच्या साथीनं रिओ ऑलम्पिकचं सुवर्णपदक मिळवण्याचं आव्हान असणार आहे.

 

या बातमीचे आणखी फोटो पाहा