तेलंगणा : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ‘मंजुळे’ या नावानं याड लावलंय. मंजुळे हे आडनाव ऐकलं की सर्रकन पिस्तुल्या, फॅन्ड्री आणि सैराट डोळ्यासमोर येतो. पण तेलंगणात महाराष्ट्रातील असा एक मंजुळे आहे, ज्याने तेलंगणातील परिस्थितीने पिचलेल्या गोरगरिबांना याड लावलंय.


 

एखाद्याला एखाद्या गोष्टीचे याड लागलं की काय काय होतं, याची अनेक उदाहरणे आहेत. बालाजी मंजुळेलाही शालेय वयात असाच याड लागलं. पण हे याड होत अभ्यासाचं, हे याड होतं आईचं स्वप्न पूर्ण करण्याचं!

 

आईचं स्वप्न.. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द!

 

बालाजी मंजुळे वडार समाजाचा. आई-वडील पारंपरिक काम अर्थात रस्त्यावर दगड फोडण्याचं काम कारायचे. त्यातून बालाजीचे वडील दिगंबर मंजुळे हे त्यांची पत्नी पार्वती आणि 7 मुलांचे संगोपन कारायचे. रस्त्यावर दगड फोडताना एकदा एक लाल दिव्याच्या गाडीतून साहेब आला. कामाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करून निघून गेला. त्याचवेळी पार्वतीबाईंच्या डोळ्यात एक स्वप्न तरले. आपल्या बालाजीनेही लाल दिव्याच्या गाडीत बसणारा साहेब होण्याचं. आईने आपली इच्छा बालाजीला बोलून दाखवली. मग काय बालाजीनेही हलाखीची परिस्थिती असताना याड लागल्यागत अभ्यास केला. त्यातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून 56 वा क्रमांक मिळवला.

 

वयाच्या 24 व्या वर्षी आयएएस
!

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. 2010 सालापर्यंत घरात वीज नाही. मग अभ्यास कसा करणार? पण बालाजीने दिव्याच्या उजेडात अभ्यास केला. त्यामुळे एक डोळ्याची दृष्टी गेली. अपंग कोट्यातून परीक्षेत अजून वरचा क्रमांक येऊ शकला असता, पण बालाजीने त्याचा फायदा घेतला नाही. वयाच्या 24 व्या वर्षी बालाजी आयएएस झाला. एक डोळ्याने अधू असूनही जीवनाकडे आणि उपलब्ध परिस्थिती सकारात्मक नजरेने पाहिले पाहिजे असे तो आवर्जून सांगतो.

 

आईचं स्वप्न पूर्ण करणारा शिवबा

 

आपल्या मुलाने कलेक्टर व्हावे, असे आपले स्वप्न जेव्हा बालाजीची आई सहकारी महिलांना सांगायची तेव्हा सर्वाना हसू यायचे. पण बालाजीने तिचे शब्द खरे करून दाखवले. आईने बालाजीला आईचे स्वप्न पूर्ण करणारा शिवबा अशी पदवी दिली.

 

जगाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून जिवाचं रान करणारे मंजुळे!

 

2009 साली सेवेत दाखल झाल्यावर बालाजीने तेलंगणातील भूमीहीन आणि परिस्थितीने पिचलेल्या दारिद्र्याशी संघर्ष करणाऱ्या लोकांना लाखो एकर जमीन कसण्यासाठी मिळवून दिली. जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी जगाला पाहिजे, त्याला नुकसान होऊ नये, म्हणून 16 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची तपासणी करून सॉईल हेल्थ कार्ड बनवून दिले. महिला सक्षमीकरणासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळेच आज संपूर्ण राज्यात बालाजी मंजुळेंचे याड लागलं आहे.

 

नागराज मंजुळेंचा सख्खा चुलत भाऊ: बालाजी मंजुळे

 

‘सैराट’ची निर्मिती करणारा नागराज आणि बालाजी हे दोघेही सख्खे चुलत भाऊ. एकाने चित्रपट क्षेत्रात आपले नाव सिद्ध केलंय, तर दुसऱ्याने शासकीय नोकरीतून जनसेवेत आपले नाव सिद्ध केलं आहे.

 

“बेताची परिस्थिती आहे म्हणून हार मानू नका. जे उपलब्ध आहे त्यातून वाट शोधा. आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे त्याचा उपयोग करा, शिक्षणानेच आपले जीवन बदलते. त्यामुळे ध्येय निश्चित करून वाटचाल करा. तुम्ही जग जिंकाल.”, असा संदेश बालाजी मंजुळेने दिलाय...

 

अंथरून पाहून पाय पसरावेत अशी म्हण प्रचलित आहे. पण शिक्षणाच्या बाबतीत ही म्हण चुकीची ठरवत बालाजी मंजुळे यांनी यशाचे शिखर तर गाठलेच आहे. पण रस्त्यावर दगडफोडीचे काम करणाऱ्या आपल्या निरागस आईवडिलांचे पांग फेडलं आहे. दगडाच्या खाणीत हिरा सापडतो म्हणजे नेमके काय हे बालाजी मंजुळेंकडे बघितल्यावर लक्षात येते.

 

बालाजी मंजुळे हे सध्या तेलंगणा सरकारमध्ये कृषी खात्येच उपसचिव आहेत.