ठाणे : रिक्षाचालकाकडून मारहाणीत एसटी चालकाचा मत्यू झालेली भिवंडीतील घटना ताजी असतानाच ठाण्यात पुन्हा एसटी बसचालकाला मारहाण करण्यात आली आहे. ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या एसटी बसचालकाला रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केली.

वाहकाच्या तक्रारीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीत बसचालक जखमी झाला आहे. मात्र आठवड्यातच दुसऱ्यांदा एसटी चालकाला मारहाण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडीत एसटीचालकाचा मारहाणीत मृत्यू

रिक्षाचालकांनी केलेल्या बेदम मारहाणीत एसटीचालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघडकीस आली होती. रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

एसटी बसचालक प्रभाकर गायकवाड बुधवारी रात्री ड्युटीवर होते. डेपोमध्ये बस नेत असताना गेटजवळ रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाड यांनी चालकाला रिक्षा हटवण्यास सांगितलं. रिक्षाचालकाने त्यांना न जुमानता रिक्षा हलवली नाही. त्यावेळी एसटी आत नेताना रिक्षाला बसचा धक्का लागला.

याच रागातून रिक्षाचालकाने गायकवाड यांना जाब विचारला. दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि आजूबाजुचे रिक्षाचालकही मदतीला आले. सर्व रिक्षाचालकांनी एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली.

या घटनेची तक्रार करण्यासाठी गायकवाड पोलिस स्थानकात गेले असता तिथेच चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीसह ठिकठिकाणी बसचालकांनी संप पुकारला आहे. नांदेड, पनवेल, परळ या एसटी डेपोंमध्ये भिवंडी घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला होता. त्यातच पुन्हा एकदा एसटी बसचालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

संबंधित बातम्या :

रिक्षाचालकांची बेदम मारहाण, भिवंडीत एसटी चालकाचा मृत्यू


भिवंडीत बसचालकाच्या मृत्यूचे ठाणे डेपोतही पडसाद


रिक्षाचालकांची बेदम मारहाण, भिवंडीत एसटी चालकाचा मृत्यू