सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लामधील रेडी येथील यशवंतगड किल्ल्यावर मुनराइज टुरिझम प्रा. लि. या कंपनीचा फलक लावण्यात आल्यामुळे शिवप्रेमी व स्थानिक चांगलेच संतापले आहेत.


वेंगुर्ला तालुक्यातील रेडी मधील यशवंतगड किल्ला ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. हा किल्ला आदिलशाहाचा होता. मात्र शिवाजी महाराजांनी नंतर हा किल्ला जिंकून घेतला असं ग्रामस्थ आणि शिवप्रेमी सांगतात. मात्र, आता याच ठिकाणी एका खाजगी मुनराईज टूरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मालकी हक्क असल्याचा फलक दोन दिवसापूर्वी लावला आहे.

किल्ल्यावर खाजगी कंपनीचा बोर्ड लावल्याच निदर्शनास आल्यानंतर काही शिवप्रेमींनी वेंगुर्ला तहसीलदार तसेच पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदनही दिलं. हा बोर्ड तातडीने काढण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.

दरम्यान, यशवंतगडावरील लावण्यात आलेल्या खाजगी बोर्ड संदर्भात एबीपी माझानं जेव्हा वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे संपर्क केला. त्यावेळी यासंदर्भात तहसीलदार शरद गोसावी यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.