नांदेड : परतीचा पाऊस धुवून काढणार असा इशारा भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक कृष्णानंद ओसलीकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन दिला आहे. याचा प्रभाव गुजरात आणि महाराष्ट्रात दिसणार आहे. आज रविवारी नांदेड जिल्ह्यात पावसाने लावलेल्या हजेरीनंतर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसले. यावरून परतीचा पाऊस झोडपणारच अशी चिन्हे दिसत आहेत. नदी काठी राहणाऱ्या नागरीकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
सध्याच्या परिस्थितीत ओडीसा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र तटावर हवामान खात्यातील वैज्ञानिक कृष्णानंद ओसलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चक्रवाट वावटळ तयार होणार आहे. बंगालच्या खाडीत सुध्दा कमी प्रभावाचे क्षेत्र तयार झाले आहे. चक्रवाट वावटळ ओडीसा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र तटांवर धडक मारणार आहे. याचा प्रभाव मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात दिसणार आहे. अत्यंत जास्त वेगाने वारे वाहणार आहेत. हा प्रभाव 27 आणि 28 सप्टेंबर रोजी जास्त प्रमाणात दिसणार आहेत. यासाठी समुद्र तटिय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलय.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह एकूण 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांना औरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजाच्या अगोदरच आज नांदेड जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झालीय आणि दुपार नंतर पावसाने रौद्ररूप धारण केलंय.
जिल्ह्यातील विष्णुपुरी, मण्याडसह छोटे मोठे सर्व पाणी प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे त्यातून सुध्दा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडन्यात येत आहे. त्यामुळे नदी काठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यास तयार आहे. त्याच प्रमाणे जनतेने अफवांवर विश्र्वास न ठेवता प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती घ्यावी व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलय.