सोलापूर : देशाच्या सीमेवर आपल्या सर्वांचं रक्षण सैनिक करत असतात. सैन्यात सेवा बजावून आपल्या घरी परतलेल्या याच माजी सैनिकांचा अनोखा सन्मान बार्शीकरांनी केलाय. गावातील ग्रामपंचायतीचा सर्व कारभार माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या पत्नी ह्यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण धोत्रे गावाने एकमताने आणि बिनविरोधपणे हा निर्णय घेतला आहे.
राज्यात जवळपास 14 हजार ग्रामपंचायतींसाठी निवडणूका पार पडत आहेत. 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. सोलापूर जिल्ह्यात जवळपास 67 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. बार्शी तालुक्यातील धोत्रे गावात देखील यंदा ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडणून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी ग्रामस्थांनी अनोखा निर्णय घेतलाय. गावातील माजी सैनिक आणि महिला राखीव जागांवर माजी सैनिकांच्या पत्नींना संधी देण्यात आली आहे.
बार्शी शहरापासून जवळपास 12 किलोमीटर अंतरावर वसलेल्या धोत्रेत जवळपास 2 हजार लोक राहतात. मात्र गावाचं वैशिष्ट सांगायचं झालं तर छोट्याशा गावात तब्बल 33 माजी सैनिक आणि 35 आजी सैनिक आहेत. 1956 साली स्थापन झालेल्या या गावात आतापर्यंत केवळ पक्षीय राजकारण चालायचं.
ग्रामपंचायत निवडणुका म्हटलं की गट-तट आलेच, त्यामुळे गावात कधीच निवडणुक बिनविरोध झाली नाही. यंदा मात्र देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचे हेतून गावकऱ्यांनी आदर्श निर्णय घेतला. गावातील माजी सैनिक सचिन लांडे, गणेश मोरे, बुवासाहेब बोकेफोडे, सुमंत जाधवर, शालन घोडके, नंदा सुरवसे, उल्लतबी शेख, वंदना जाधवर, मंगल जाधवर यांना ग्रामस्थांनी बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलंय.
Corona Update | राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण; पिंपरी- चिंचवडमध्ये दहशत
धोत्रे गावात ३ प्रभागासाठी ९ ग्रामपंचायत सदस्य आहेत. ९ सदस्यांसाठी एकूण १७ सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र मनाचा मोठेपणा दाखवत उर्वरित ८ सदस्यांनी आपले अर्ज माघारी घेतले. माजी सैनिकांप्रती आदर व्यक्त करत अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवारांचा देखील ग्रामस्थांनी सन्मान केला. दरम्यान गावकऱ्यांनी दाखवलेल्या या विश्वासास कोणत्याही पद्धतीने तडा जाऊ देणार नाही. अशी प्रतिक्रिया माजी सैनिकांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली. सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या या सैनिकांचा अनोखा सन्मान करुन धोत्रे ग्रामस्थांनी अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.