बीड :   कोरोनामुळे मागच्या दीड वर्षापासून लग्न समारंभांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र आता एकीकडे लग्नसमारंभासाठी निर्बंध शिथिल झाले असले तरी लग्न लावण्यासाठी पुढचे चार महिने मुहूर्तच नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.  बीड जिल्ह्यात लग्नसमारंभासाठी 200 लोकांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र या काळात लग्नाचे मुहुर्तच नसल्याने मंगल कार्यालयं ओस पडली आहेत. 
 
ऑगस्ट महिन्यामध्ये लग्न समारंभाचे शुद्ध मुहूर्त नाहीत मात्र 18,20, 21,25, 26, 27, 30 आणि 31 यासोबतच सप्टेंबर महिन्यातील 1,8, 16 व 17 या तारखेचे गौण मुहूर्त आहेत. म्हणजे पुढचे चार महिने लग्नासाठी मुहूर्त नसल्याने अनेक जणांनी लग्न लांबणीवर टाकले आहेत.



लग्न समारंभ बंद असल्याने यावर चालणारे अनेक व्यवसाय आता डबघाईला आले आहेत. केटरर्स व्यवसाय तर फक्त नावाला उरला आहे. गेल्या वर्षीपासून मोठ्या ऑर्डर मिळत नसल्याने अनेक कामगार कामावरून काढावे लागले आहेत. मोठ्या समारंभासाठी लागणारी साधनसामुग्री धूळ खात पडून आहे. 


एकीकडे मोर्चे सभा यासाठी लोकांची मोठी गर्दी जमत आहे तर धार्मिक आणि इतर कार्यक्रमासाठी परवानगी मिळत नाही. त्यामुळे बँड पथकांना देखील गेल्या वर्षीपासून आपलं साहित्य घरातच ठेवावं लागल्याने बँड व्यावसाईक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. 



कोरोनाचे रुग्ण जास्त होते आणि म्हणून निर्बंध असल्याकारणाने लग्नसमारंभ मोजक्या लोकात उरकावा लागायचा आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आलीच तर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशीच स्थिती होईल अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.