सोलापूर : कोरोना नियमांना पायदळी तुडवत झालेल्या आमदार पुत्रांच्या लग्न प्रकरणात अखेर आरोपी म्हणून नवरदेवांची नावं देखील वाढविण्यात आली आहेत. बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचा विवाह सोहळा रविवारी सायंकाळी 6.45 वाजता पार पडला. या सोहळ्यात हजारो लोकांची गर्दी जमली होती. इतकंच काय तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक आमदार या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आता आरोपी वाढवण्यात आले आहेत.
या लग्नात माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह अनेक नेते मंडळी झाडून हजर होते. मात्र, या प्रकरणात केवळ एका कर्मचाऱ्यावर पोलिसांनी आयोजक या नात्याने गुन्हा दाखल केला होता.
सोलापुरात आमदार पुत्रांच्या लग्नाला हजारोंची गर्दी, गुन्हा मात्र एकट्या आयोजकावर
मात्र, या प्रकरणात आता पोलिसांनी आमदार राजेंद्र राऊत यांची दोन्ही मुले रणजीत राजेंद्र राऊत आणि रणवीर राजेंद्र राऊत यांना देखील आरोपी म्हणून वाढवले आहे. तपासादरम्यान दोघांची नावे आरोपी म्हणून वाढविल्यानंतर तसे पत्र न्यायालयाकडे सादर केल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी एबीपी माझाला दिली. या प्रकरणात सुरुवातीला केवळ योगेश मारुती पवार या एकाच व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, आता आणखी दोन आरोपींची नावे वाढविल्याने एकूण तीन आरोपींविरोधात आता गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. या सर्वांवर भादंवि कलम 188, 269, 270, साथीचे रोग अधिनियम 2, 3, 4 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे कलम 51 (ब), महाराष्ट्र कोव्हिड विनियमन 2020 कलम 11 अन्वये गुन्हा दाखल.
केवळ 50 लोकांच्या उपस्थिती लग्न कार्य करण्यास हरकत नसल्याची लेखी समज पोलिसांनी योगेश पवार यांना दिली होती. मात्र, प्रत्यक्षात हजारोंच्या संख्येने लोक या लग्न सोहळ्यास हजर राहिल्याने पोलिसांनी केवळ योगेश पवार यांच्याच विरोधात आयोजक म्हणून गुन्हा नोंदविला होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लग्नात वेगळा न्याय आणि आमदारांच्या मुलांच्या लग्नात वेगळा न्याय असे का? असा सवाल बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांनी उपस्थित केला होता.