Pandharpur Vitthal Mandir news : विठ्ठल मंदिरामध्ये (Vitthal Mandir) दुरुस्तीचे काम सुरु असताना अनेक धोकादायक गोष्टी समोर आल्या आहेत. वेळीच दुरुस्ती केल्यामुळं भविष्यातील मोठ्या दुर्घटना टळल्या आहेत. सध्या विठ्ठल मंदिरात 15 मार्चपासून पायावरील दर्शन बंद करुन मुखदर्शन व्यवस्था सुरु केली आहे. हे काम 15 मे पर्यंत संपेल अशी अपेक्षा होती. मात्र जसजशी गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी येथील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली, त्यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
चांदी काढल्यावर धोके आले समोर
देवाच्या गाभाऱ्यात अनेक ठिकाणी चांदी लावली होती. ही चांदी काढण्यात आल्यावर हे धोके समोर आले आहेत. वेळीच दुरुस्तीचे काम पुरातत्व विभागानं हाती घेतल्यानं भविष्यातील मोठ्या दुर्घटना टळू शकल्या. विठ्ठल मूर्ती ज्या चौथऱ्यावर उभी आहे, त्याच्या खाली असलेल्या मोठ्या दगडी शिळेवरील चांदी काढल्यावर ही शिळा चिरल्याचे समोर आले आहे. यानंतर पुरातत्व विभागाने तातडीने या चौथरा दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. याशिवाय चौखांबीमध्ये जेथे मुख्यमंत्री महापूजेपूर्वी संकल्प सोडतात, त्याच्या छतावरील मोठी दगडी शिळा देखील चिरल्याचे समोर आले आहे. यामुळं खूप मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र, आता पुरातत्व विभागाने यात लक्ष घालून तातडीने या मोठ्या शिळेची दुरुस्तीचे कामही हाती घेतले आहे. याच ठिकाणाहून भाविक देखील देवाच्या पायावरील दर्शनासाठी जात असतात.
1 जूनपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न
विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यासमोर असणाऱ्या सोळखांबीमध्येही अनेक दगडी खांबांना चिरा गेल्या आहेत. काही ठिकाणाची दगडे निसटली आहेत. दुरुस्तीचे काम सुरु करताना या सर्व गोष्टीमधील धोके समोर आल्याने नव्याने पुरातत्व विभागाने यात कायमस्वरूपी दुरुस्तीच्या दृष्टीने उपाययोजना सुरु केली आहे. यामुळं मंदिरात येणाऱ्या भाविकांना होऊ शकणारे मोठे संभाव्य धोके दूर होणार आहेत. आता 1 जूनपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ अभियंते पुरातत्व विभागाने येथे आणले आहेत. चांदी काढल्यानंतर आणि संवर्धनाचे काम करताना हे धोके कळले नसते तर खूप मोठी दुर्घटना होऊ शकली असती.
दगडावर कोणत्याही पद्धतीनं सोने अथवा चांदी लावू नका, पुरातत्व विभागाच्या सूचना
आता सर्व दुरुस्तीची कामे करणे सुरु झाले आहे. आता पुढील 500 वर्षे विठ्ठल मंदिराचे आयुष्य वाढेल यापद्धतीने कामे हाती घेतली आहेत. ही कामे 1 जूनपर्यंत पूर्ण झाल्यावर भाविकांना पायावरील दर्शनाची सुरुवात होऊ शकणार आहे. जसे जसे गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी येथे बारकाईने कामे सुरु असताना हे नवीन धोके समोर आल्याने दुरुस्तीच्या कमला लागणार वेळ वाढला आहे. वेळ जरी वाढला असला तरी खूप मोठे संभाव्य धोके दूर होण्यास मदत झाली आहे. एकंदर 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर बनत असताना त्याला संपूर्ण पुरातन लूक येणे अपेक्षित होते. त्याचपद्धतीने ही कामे केली जात आहेत. आता दगडाचे श्वसन सुरु ठेवण्यासाठी या काळ्या पाषाणावर चांदी लावण्यास पुरातत्व विभागाने विरोध केला आहे. ज्या ठिकाणी लाकडी दारे आहेत ती चांदीची करा मात्र, दगडावर कोणत्याही पद्धतीने सोने अथवा चांदी लावू नका अशा सक्त सूचना पुरातत्व विभागाने दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: