मुंबईः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत 3 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 ऑक्टोबर 2016 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

 

आरक्षण सोडत जाहीर केल्यानंतर प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, असंही सहारिया यांनी सांगितलं. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 10 महापालिकांची मुदत मार्च-एप्रिल 2017 मध्ये संपत आहे.

 

महापालिकेची सदस्य संख्या 2011 च्या लोकसंख्येनुसार

 

निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या अधिनियमात 227 एवढी निश्चित केली आहे. उर्वरित महापालिकांसाठी 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे सदस्य संख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रभाग रचना करण्यात येणार आहे.

 

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना एक सदस्यीय, तर अन्य सर्व महापालिकांची प्रभाग रचना बहुसदस्यीय पद्धतीने केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेस 23 सप्टेंबर 2016 पर्यंत मान्यता देण्यात येणार आहे.

 

असं आहे आरक्षण सोडतीचं वेळापत्रक

 

आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत मुंबईसाठी 5 ते 20 ऑक्टोबर, तर उर्वरित महापालिकांसाठी 10 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत संबंधित महानगरपालिकेत हरकती आणि सूचना दाखल करता येतील.

 

राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत कलेले अधिकारी त्यावर 4 नोव्हेंबर पर्यंत सुनावणी देणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी 5 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होईल.

 

मुंबईची 22 नोव्हेंबरला, तर उर्वरित महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 25 नोव्हेंबर 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.