औरंगाबाद : परळी सामूहिक बलात्कार खटल्याचा निकाल लागला आहे. 2010 मध्ये लष्करातील महिला अधिकाऱ्यावर झालेल्या बलात्कारप्रकरणी, चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दीपक जवळे, अभय पोरे, विजय बडे आणि सुनील एखंडे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या नराधमांची नावं आहेत. जन्मठेपेशिवाय न्यायालयानं दोषींना प्रत्येकी 10 लाखांचा दंडही ठोठावला आहे.
घटनेच्या दिवशी पीडित महिला कुटुंबासह देवदर्शन करून घराकडे परतत होती. त्यावेळी आरोपींनी पाठलाग करून पीडित महिलेवर बलात्कार केला. तब्बल 6 वर्षे औरंगाबादच्या विशेष मोक्का कोर्टात बलात्कार प्रकरणाचा खटला सुरू होता.
सुनावणीदरम्यान, एकूण 34 जणांनी साक्ष नोंदवली. त्या जबाबाच्या आधारे सरकारी वकिलांनी आरोपींवरचे गुन्हे सिद्ध केले. कोर्टाच्या निर्णयावर तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी समाधान व्यक्त केलं आहे.