Repair of Kokan ghats : कोकणातील घाट रस्त्यांची सध्या दुरावस्था आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमधील भुईबावडा घाटात खचलेल्या रस्त्यामुळं अवजड वाहतूक गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे. आता पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे, तरी अद्यापही खचलेल्या रस्त्यावर उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं पावसाळ्यात घाटातील संपूर्ण वाहतूक बंद करण्याची वेळ येणार आहे. पावसाळ्यापूर्वी खचलेल्या घाटात उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. दुसरीकडं करुळ घाट दुरुस्तीसाठी गेल्या महिनाभरापासून अवजड वाहतूक बंद आहे. त्यामुळं वाहांचालकांना फोंडाघाट मार्गे कोल्हापूरला जावं लागत आहे.


कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटाप्रमाणेच महत्त्वाचा असलेला भुईबावडा घाटमार्ग आहे. रिंगवाडीपासून 5 किमी अंतरावर घाटात पावसाळ्यात रस्त्यावर भेगा पडल्या होत्या. पावसाळ्यात या भेगामध्ये पाणी मुरुन भेगा मोठ्या होऊन, सुमारे 200 फूट लांब रस्ता मधोमध खचला आहे. त्यामुळं प्रशासनाने घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. त्यानंतर नागरिकांच्या मागणीवरुन घाटातून हलक्या वाहनांना परवानगी देण्यात आली. मात्र, अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यातच गेले महिनाभर दुरुस्तीसाठी करुळ घाट अवजडड वाहतुकीला बंद करण्यात आला होता. त्यामुळं जीव धोक्यात घालून वाहनचालक भुईबावडा घाटातून ये जा करत आहेत.


भुईभावडा घाट रस्ता मुळात अरुंद असून, एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंच डोंगर कडेकपारी आहे. घाटात अनेक नागमोडी वळणे आहेत. तसेच रात्रीच्यावेळी घाटात दाट धुके असते. या धुक्यातून वाहनचालकांना वाहन चालवताना रस्त्याचा नीट अंदाज येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागानं संपूर्ण घाटमार्गाचा सर्व्हे करुन आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. करुळ घाटमार्गाला पर्यायी मार्ग म्हणूनही भुईबावडा घाटमार्गाकडे पाहिले जाते. भुईबावडा घाटात खचलेल्या ठिकठिकाणी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय पथकाकडून ऑगस्टमध्ये पाहणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुचवलेल्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. मात्र, केंद्रीय पथकाने पाहणी करुन सहा महिने होऊन गेले तरी अद्याप प्रत्यक्ष कोणतेही काम होऊ शकले नाही. 


तरेळे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेला करुळ घाट वाहतुकीसाठी बंद आहे. तर भुईबावडा घाट पावसाळ्यात रस्त्याला भेगा गेल्याने बंद आहे. त्यामुळं वाहांचालकांना फोंडाघाट मार्गे कोल्हापूरला जावं लागत आहे. पावसाळ्यात कोकणातील सर्वच घाटात दरड कोसळून घाटमार्ग बंद ठेवावे लागतात. त्यामुळे पर्यायी घाटमार्ग होणे गरजेचे आहे. आजिवंडे घाट रस्ता झाल्यास सिंधुदुर्ग कोल्हापूर अंतर कमी होण्यास मदत होईल आणि पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता फारच कमी आहे.