रायगड : रायगडमध्ये (Raigad) नामांतराचा विषय सध्या चर्चेत आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे रायगडवाडी असे नामकरण करण्याच्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रस्तावाला गावकऱ्यांनी आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आता किल्ले रायगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती महामार्ग नाव द्या, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांनी केली आहे. आज संभाजीराजे यांनी दिल्ली येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेऊन निवेदन देत ही मागणी केली आहे.
महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण
206 कोटी खर्च करुन हा महामार्ग उभारण्यात आला आहे. सद्यस्थितीत या महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वास देखील संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर व्यक्त केला आहे. सोबतच या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास, पथदिवे, विश्रांतीस्थळे, ऐतिहासिक शिल्पं, आणि सांस्कृतिक दर्शन घडवणारे घटक असावेत, अशी संकल्पना सुद्धा त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याजवळ मांडली. या निवेदनाची केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तत्काळ मान्यता दिली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देखील दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
भाजप सरकारच्या काळात अनेक ठिकाणांचे नामांतरण
राज्यात भाजप सरकार आल्यानंतर अनेक गावांचे आणि ठिकाणांच्या नामांतराची मागणी होऊ लागली. भाजपचे नेते विविध ठिकाणांची मावे बदलण्याची मागणी करत आहेत. या सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर केले आहे. त्याच बरबोर अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर असं करण्यात आलं आहे. त्यानंतर आता किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे देखील नामांतर करण्याची मागणीला मंजूरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर इस्लामपूर शहराचे देखील नाव बदलून ईश्वरपूर असे करण्यात आले आहे. अशातच आज संभाजीराजे छत्रपतींनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. संभाजीराजेंनी रायगडकडे जाणाऱ्या महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाचे नामकरण करण्याची मागणी केली आहे. या महामार्गाला 'छत्रपती महामार्ग' असे नामकरण करावे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या महामार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आहे. 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Gopichand Padalkar : छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव रायगड वाडी करा; गोपीचंद पडळकरांची नवी मागणी, नामांतराचा मुद्दा सरकारच्या दारी जाणार