सोलापूर : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्बंध शिथिल करण्यात आल्याने जवळपास दोन महिन्यानंतर आज शहरातील सर्व व्यवहार पुन्हा एकदा सुरु होत आहेत. मनपा प्रशासनाने काल (3 जून) रात्री आदेश काढत निर्बंध शिथिल केले आहे. महापालिकेला स्वतंत्र घटक म्हणून मान्यता मिळाल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांनी हे आदेश जारी केले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 ऐवजी आता दुपारी 2 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. तर दुसरीकडे विना अत्यावश्यक सेवा देखील सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. जवळपास दोन महिन्याननंतर दुकानं सुरु होत असल्याने व्यपाऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. सकाळी शहरातील छोट मोठे व्यवसायिकांनी दुकानं स्वच्छ करत पुन्हा व्यवसायाला सुरुवात केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. 






सोलापूर शहरातील हे निर्बंध शिथिल 
1) अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज सकाळी 7 ते 2 पर्यंत
2) विना अत्यावश्यक सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत
3) सर्व बँका सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहतील
4) हॉटेल, बार, रेस्टॉरंट पार्सल सेवा दुपारी 2 पर्यंत, होम डिलिव्हरी मात्र रात्री 8 पर्यंत
5) सर्व दुकानदारांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा लसीकरण प्रमाणपत्र असणे बंधनकारक


सोलापुरात हे निर्बंध कायम राहणार  
1) दुपारी 3 नंतर संचारबंदी. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर फिरता येणार नाही. 
2) धार्मिक स्थळे, स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश
3) मंगलकार्यालयात केवळ 25 लोकांना परवानगी
4) शॉपिंग सेंटर, मॉल्स यांना कोणतीही परवानगी नाही


सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात परिस्थिती आटोक्यात असताना कोणतीही सवलत न दिल्याने व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात होती. 2010 च्या जणगनेनुसार 10 लाखांपेक्षा लोकसंख्या कमी असल्याने सोलापूर शहराला ग्रामीण भागाचेच आदेश लागू होते. या शासकीय नियमामुळे सोलापूर शहरात लॉकडाऊनच्या नियमात कोणतीही शिथिलता देण्यात आली नव्हती. परतुं आता महापालिकेला स्वतंत्र घटक म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर  आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देत काही निर्बंध शिथिल केले आहे.