नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात सध्या अस्तित्वात असलेल्या यशवंत स्टेडियमच्या पुनर्विकास आराखड्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नागपूर महानगरपालिकेत पार पडली.
या बैठकीत शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. शिवाय बैठकीत यशवंत स्टेडियमच्या पुनर्विकास आराखड्यावर चर्चा करून त्याला अंतिम रूप देण्यात आलं. यशवंत स्टेडियमच्या पुनर्विकास आराखड्यानुसार यशवंत स्टेडीयमच्या सध्याच्या जुन्या स्टेडियमला पाडून त्या ठिकाणी नवे बहुमजली स्टेडियम उभारलं जाणार आहे.
हे स्टेडियम फुटबॉलसाठी असेल. (सध्याही हे फुटबॉलचेच स्टेडियम आहे) शिवाय त्यामध्ये इतर इनडुअर स्पोर्ट्ससाठीही जागा असणार आहे. नवीन स्टेडियमच्या अवतीभवतीच्या 15 एकरच्या विस्तीर्ण जागेवर पाच बहुमजली व्यावसायिक इमारती उभारल्या जाणार आहेत.
याच प्रकल्पाअंतर्गत स्टेडियम आणि पाच इमारती जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारकही या ठिकाणी उभारलं जाणार आहे. या पाच व्यावसायिक इमारतीमध्ये तब्बल 50 रेस्टॉरंट्स आणि इतर दुकानांसाठी जागा असेल. सोबतच तब्बल पाच हजार चारचाकी वाहने आणि तेवढ्याच दुचाकी वाहनांसाठी मल्टीलेव्हल पार्किंगची सुविधा असेल.
नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी तब्बल 27 लाख वर्ग फूट जागेवरचं हे व्यावसायिक कॉम्प्लेक्स नागपूरचं सर्वात मोठं निर्माणकार्य ठरणार आहे. तब्बल 600 कोटी रुपयांचा हा प्रकलप नागपूर महानगरपालिका आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन संयुक्तरित्या पूर्ण करणार आहेत.
यशवंत स्टेडियम पुनर्विकास प्रकल्पाची वैशिष्ट्ये
प्रकल्पासाठी 600 कोटींचा खर्च
15 एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि रिक्रिएशन सेंटर
मल्टीलेव्हल व्हेहिकल फ्री मार्ग
सुमारे 50 रेस्टॉरंट
27 लाख वर्गफूट व्यावसायिक जागा उपलब्ध होणार
पाच हजार वाहनांची पार्किंग सुविधा
अत्याधुनिक इनडुअर आणि आऊटडुअर स्टेडियम
नागपूरच्या मध्यवर्ती भागात फुटबॉलसाठी भव्य स्टेडियम उभारणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2018 10:53 PM (IST)
केंद्रीय परिवहन मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नागपूर महानगरपालिकेत पार पडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -